बीईजीसह गावातील धावपटूंनी जिंकली शर्यत

बीईजीसह गावातील धावपटूंनी जिंकली शर्यत

पुणे -  ‘कमॉन कमॉन यू डिड इट... ओनली फ्यू मीटर्स लेफ्ट...’ अशा आरोळ्यातच एकेक धावपटू फिनिश लाइनवर पोचत होते अन्‌ स्पर्धकांच्या चेहऱ्यावर स्पर्धा पूर्ण केल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. निमित्त होते म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलात रविवारी पार पडलेल्या बजाज अलियांझ पुणे हाफ मॅरेथॉनचे. या स्पर्धेतील पाच किलोमीटर अंतर स्पर्धेत मुलांच्या बीईजीच्या रवी दहिया, कोस्ट गार्डच्या सनेशकुमार, एएसआयच्या बंटी तसेच मुलींच्या गटात शिरपूरच्या शकिला वसावे, परभणीच्या अश्‍विनी तुरुकझाडे तसेच अंजली वयासेने प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेतील मुख्य २१ किलोमीटर अंतराच्या हाफ मॅरेथॉनपाठोपाठ टप्प्याटप्प्याने १० किमी व ५ किमी अंतराची मॅरेथॉन झाली. यामधील पाच किलोमीटरच्या स्पर्धेत आबालवृद्धांसह शेकडो चिमुकल्या धावपटूंनी सहभाग घेतला होता. 

उत्साहात सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेक धावपटू बालेवाडी स्टेडियममधून अवघ्या काही मिनिटांत राधा चौकात पोचत होता. तेथून डी. मार्ट, बाणेर, सिझेंटा कंपनी चौक - सायकर, बालेवाडी हायस्ट्रीट, ममता चौकातून पूढे मार्गक्रमण करीत होते. धावपटूंची  धाव एकत्रच होती. पण, आपल्याला पुढे जायचे, असे त्यांच्या देहबोलीतून जाणवत होते. 

त्यांच्या याच उद्दिष्टाला टप्प्याटप्प्यावर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेल्या नागरिकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहाने नवी ऊर्जा मिळत होती. या वेळी लहान मुले हरखून जात होती, तर ज्येष्ठ नागरिकांना ध्येय गाठण्याची जिद्द मिळत होती. एकेक खेळाडू सायकर चौकमार्गे राधा चौकातून परतीच्या मार्गावर आल्यावर धावपटूंना फक्त अंतिम रेषाच दिसत होती. त्यामुळे साहजिकच त्यांचा वेग वाढत होता.

अंतिम रेषा दृष्टिक्षेपात आल्यावर प्रेक्षकांच्या ‘कमॉन कमॉन यू डिट इट...’ अशा आरोळ्यांनी धावपटू आपल्या उद्दिष्टांपर्यंत म्हणजेच अंतिम रेषेजवळ पोचत होते. त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्पर्धा पूर्ण केल्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. 

निकाल
पुरुष ः रवी दहिया (बीईजी, १५ मिनीट ५० सेकंद), सनेश कुमार (कोस्टगार्ड १५ मिनीट ५८ सेकंद), बंटी (एएसआय, १६ मिनीट १२ सेकंद)
महिला ः शकिला वसावे (शिरपूर, १९ मिनीट ३३ सेकंद), अश्‍विनी तुरुकझाडे (परभणी, २० मिनीट ३ सेकंद), अंजली वयासे (शिरपूर, २० मिनीट ७ सेकंद)

बहुत ही बढिया मॅरेथॉन थी. ही शर्यत जिंकण्यासाठी पूर्ण तयारी केली होती. हवामानही चांगले होते. थंडी राहील, असे वाटत होते. 
- रवी दहिया (बीईजी)

मॅरेथॉनच्या मार्गावर आम्हाला लोक प्रोत्साहित करीत होते. त्यातून धावण्याची ऊर्जा मिळत होती. स्पर्धेत यश मिळेल हा आत्मविश्‍वास होता.
- सनेशकुमार  (कोस्टगार्ड)

स्पर्धेचे नियोजन उत्तम होते. टप्प्याटप्प्यावर सपोर्ट मिळत होता. हा सपोर्ट फिनिश लाइनपर्यंत होता, यामुळे उत्साह द्विगुणित झाला.
- बंटी (आर्मी स्पोर्ट्‌स इन्स्टिट्यूट)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com