स्वाती, ज्योतीने जिंकली मने

swati-gadhve
swati-gadhve

पुणे - क्रीडा क्षेत्रातील खरी गुणवत्ता ही शहरात नाही, तर ग्रामीण भागात दडली असल्याचे स्वाती गाढवे आणि ज्योती गवते यांनी बजाज अलियांझ पुणे मॅरेथॉन शर्यतीत दाखवून दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा दांडगा अनुभव असलेल्या या दोघींनी अनुक्रमे पहिला दुसरा क्रमांक मिळविला. नयन किरदत तिसरी आली.

शालेय जीवनापासूनच धावायला सुरुवात केल्यावर स्वातीने अल्पावधीतच आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. लांब पल्ल्याच्या शर्यतीत तिने आपला दबदबा राखला. राज्य आणि राष्ट्रीय क्रॉस कंट्री धावात स्वाती आंतरविद्यापीठ स्पर्धेतून आपले नाव गाजवू लागली आणि जागतिक क्रॉसकंट्रीपर्यंत तिची मजल गेली. स्वाती म्हणाली, ‘‘गावाकडे धावत असताना यात कारकीर्द घडेल असे कधीच वाटले नव्हते. पण, पुण्यात प्रशिक्षक भास्कर भोसले यांच्याकडे आले तेव्हा माझ्यातील धावपटूला खऱ्या अर्थाने पैलू पडले. त्यानंतर कुमार, फेडरेशन करंडक असा अनुभव घेत मी घडत गेले. आता दुखापतीपासून दूर राहून अधिक चांगली कामगिरी करायची आहे.’’

पुणे हाफ मॅरेथॉनच्या अनुभवाविषयी बोलताना स्वाती म्हणाली, ‘‘मार्ग चांगलाच होता. हवामानात कमी अधिक आर्द्रता होती. पण, सरावामुळे त्याचा त्रास जाणवला नाही. संयोजकांनी केलेल्या सुरेख व्यवस्थेमुळे मार्गात कसलाही अडथळा आला नाही. स्वागत करणाऱ्या चाहत्यांनाही मी धन्यवाद देते.’’

पोलिसांच्या १७ कि.मी. शर्यतीपासून धावायला सुरवात करणाऱ्या परभणीच्या ज्योतीने आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. अलीकडेच काठमांडू येथे झालेल्या सॅफ स्पर्धेत तिने २ तास ५२ मिनिटे ४२ सेकंद अशा कामगिरीसह पूर्ण मॅरेथॉनमध्ये ब्राँझपदक मिळविले. ज्योती म्हणाली, ‘‘सुरवातीला ४०० तसेच ८०० मीटर शर्यतीचा प्रयत्न केला. पण, मी लांब पल्ल्याच्या शर्यतीतच अधिक रमले आणि यातच पुढे जाण्याचे ठरवले. प्रशिक्षक रवी रासकटला यांनीही माझ्याइतकीच मेहनत घेतली. त्यामुळेच मी घडू शकले. आजच्या शर्यतीचा मार्ग निश्‍चितच चांगला होता. त्यात हवामानही अनुकूल होते.’’

महिला निकाल
    स्वाती गाढवे (१ तास २० मिनिट १९ सेकंद)
    ज्योती गवते (१ तास २१ मिनिट २५ सेकंद)
    नयन किरदत (१ तास २३ मिनिट ३८ सेकंद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com