बजरंगचे सोनेरी स्वप्न भंगले

Bajrang-Punia
Bajrang-Punia

बुजापेस्ट (हंगेरी) - यंदाच्या वर्षात जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या बजरंग पुनियाने जागतिक स्पर्धेतील आपल्या पदकाचा रंग बदलला खरा, पण त्याला सोनेरी किनार देता आली नाही. जपानच्या ताकुतो ओटोगुरोकडून त्याला १६-९ असा पराभव पत्करावा लागला.

बजरंगने यापूर्वी २०१३ मध्ये येथेच ब्राँझ जिंकले होते. या वेळी त्याच्या पदकाचा रंग रुपेरी झाला. यंदाच्या वर्षांत राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याने त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, जपानच्या चपळ कुस्ती खेळणाऱ्या ताकुतोसमोर बजरंगने जिगर दाखवली खरी, पण या प्रयत्नांत त्याची दमछाक झाली आणि त्याचा फायदा ताकुतो याने अचूक उठवला.

सुरवातीपासून आक्रमक राहिलेल्या ताकुतोने ५-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर बजरंगने दोन वेळा त्याचा ताबा मिळवत पिछाडी ५-४ अशी भरून काढली होती. बजरंगच्या प्रतिहल्ल्याने सावध झालेल्या ताकुतोने आपला पवित्रा पुन्हा बदलला आणि दोन गुणांची कमाई करून आघाडी वाढवली. लढतीत ७-६ अशा स्थितीनंतर मात्र बजरंग त्याला आव्हान देऊ शकला नाही. 

बजरंगच्या या कामगिरीने जागतिक स्पर्धेत पदक मिळविणारा तो भारताचा दुसरा मल्ल ठरला. यापूर्वी सुशील कुमार याने २०१६ च्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते.

अनोखी बजरंगी कमाल
‘खेलरत्न’ पुरस्कारासाठी डावलण्यात आलेल्या या भारतीय मल्लाची यंदाच्या वर्षातील कामगिरी कमाल राहिली. एका वर्षात चार आंतरराष्ट्रीय स्पर्धांत पदक मिळविणारा तो पहिला भारतीय मल्ल ठरला. या वर्षी त्याने राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे.

आशियाई अजिंक्‍यपद स्पर्धेत तो ब्राँझपदकाचा मानकरी ठरला होता. आता जागतिक स्पर्धेतील रौप्यपदक त्याने मिळविले. विशेष म्हणजे जागतिक स्पर्धेतील बजरंगचे हे दुसरे पदक ठरले. यापूर्वी त्याने २०१३ मध्ये बुडापेस्ट येथेच झालेल्या जागतिक स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई केली होती. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील हे त्याचे पाच वर्षांतील चौदावे पदक ठरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com