World Cup 2019 : बांगलादेश आव्हान राखण्यास उत्सुक; चिवट अफगाणिस्तानशी आज लढत

ban vs afg match preview.jpg
ban vs afg match preview.jpg

वर्ल्ड कप 2019 : साऊदम्प्टन : विश्‍वकरंडक क्रिखेट स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी बांगलादेश संघ नक्कीच उत्सुक असेल. पण, त्यासाठी त्यांना आज भारताला झुंजविणाऱ्या चिवट अफगाणिस्तानचा प्रतिकार मोडून काढावा लागेल. 

श्रीलंकेने इंग्लंडवर मिळविलेल्या विजायने बांगलादेश संघाला हुरुप आला. उपांत्य फेरी गाठण्याच्या त्याच्या आशा एक प्रकारे कायम राहिल्या. बांगलादेश संघ सध्या गुणतक्‍त्यात सहाव्या स्थानावर आहे. 

वेस्ट इंडिजविरुद्ध तीनशेहून अधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग सहज करताना बांगलादेश संघाने आपल्यातील जिगर दाखवून दिली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील त्यांनी 383 धावांचा पाठलाग करताना 333 धावांची मजल मारली होती. शकि अल हसनला फलंदाजी बढती देण्याचा त्यांचा निर्णय या स्पर्धेत चांगलाच यशस्वी ठरला आहे. बांगलादेशाच्या आतापर्यंतच्या वाटचालीत त्याचा मोठा वाटा आहे. तमिम इक्‍लाब, मुशफिकूर रहिम हे अन्य फलंदाजही चांगली फलंदाजी करत आहेत. लिटन दास यानेही आपली चमक दाखवून दिली आहे. त्यामुळे किमान फलंदाजीच्या आघाडीवर बांगलादेश एक पाऊल पुढे राहिल असेच आता वाटत आहे. मात्र, अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ज्या पद्धतीने भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले ते बघता बांगलादेश संघाला नक्कीच आपली रणनिती बदलायला लागेल यात शंका नाही. गोलंदाजीच्या आघाडीवर त्यांना नक्कीच विचार करावा लागेल. बहुतेक सामन्यात त्यांच्या गोलंदाजांना म्हणावे तेवढे यश आलेले नाही.

तीनशेच्यापुढील धावसंख्या त्यांच्या गोलंदाजीसमोर निघाल्या आहेत. 
दुसरीकडे अफगाणिस्तान संघ पहिल्या विजयासाठी उत्सुक असेल. भारताविरुद्ध त्यांचे प्रयत्न थोडक्‍यात कमी पडले. पण, संभाव्य विजेतेपदाच्या शर्यतीत असणाऱ्या भारतासमोर आव्हान उभे केल्याचा आनंद त्यांचा आत्मविश्‍वास उंचावण्यात नक्कीच फायद्याचा ठरेल यात शंका नाही. 
बांगलादेश संघाला रोखताना अफगाणिस्तान संघ पुन्हा एकदा त्यांच्या फिरकी गोलंदाजांकडून भरीव कामगिरीची अपेक्षा बाळगून आहे. हवामानही कोरडे असल्यामुळे फिरकी गोलंदाजीस नक्कीच साथ मिळेल. या संधीचा फायदा घेऊन अफगाणिस्तान आपले गुणांचे खाते उघडण्याचा जरुर प्रयत्न करेल.

खेळपट्टीवर थांबल्यास धावा निघतात हा विश्‍वास भारताविरुद्धच्या सामन्यातून त्यांना नक्कीच मिळाला आहे. त्यापूर्वी इंग्लंडविरुद्ध देखील त्यांनी पन्नास षटके खेळून काढली होती. सहाजिकच बांगलादेशाची फलंदाजी आणि अफगाणिस्तानची फिरकी असा आजचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com