बांगलादेशचा ऐतिहासिक कसोटी विजय; ऑस्ट्रेलिया पराभूत

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पहिल्या डावात 260 धावा केलेल्या बांगलादेशला प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलिया 217 धावाच करु शकल्याने 43 धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर बांगलादेशने 221 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 265 धावांचे सशक्त आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 244 धावांतच आटोपला

ढाका - बांगलादेशचा अष्टपैलु खेळाडू शाकिब अल हसन याने दोन्ही डावात मिळून घेतलेल्या 10 बळींच्या सहाय्याने बांगलादेशने आज (बुधवार) ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी विजयाची नोंद केली! बांगलादेशने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा पहिलाच विजय आहे. ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघास सामन्याच्या चौथ्याच दिवशी धूळ चारत बांगलादेशने 20 धावांनी विजय मिळविला.

शैलीदार ऑसी फलंदाज डेव्हिड वॉर्नर याने झुंजार शतक (112 धावा) करत बांगला फिरकीपटूंचा प्रतिकार केला. मात्र त्याचे प्रयत्न अपुरे पडले. पहिल्या डावात पाच बळी घेणाऱ्या हसन याने या डावातही 85 धावांत 5 बळी घेत बांगलादेशच्या या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलला.

पहिल्या डावात 260 धावा केलेल्या बांगलादेशला प्रत्युत्तरादाखल ऑस्ट्रेलिया 217 धावाच करु शकल्याने 43 धावांची आघाडी मिळाली होती. यानंतर बांगलादेशने 221 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 265 धावांचे सशक्त आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 244 धावांतच आटोपला.

ऑस्ट्रेलियाचा डाव एका वेळी 4 बाद 171 अशा मजबूत स्थितीत होता. मात्र फिरकीपटू ताइजुल इस्लाम याने पीटर हॅंड्‌सकॉंब (15 धावा - 31 चेंडू) याला माघारी पाठवित ऑस्ट्रेलियाच्या डावास निर्णायक खिंडार पाडले. यानंतर नियमित अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव सावरु शकला नाही.

Web Title: bangladesh australia test cricket