बांगलादेशच्या भारत दौऱ्याचा प्रश्‍न बिकटच

वृत्तसंस्था
Tuesday, 22 October 2019

अवघ्या आठवड्यावर आलेला भारत दौरा लक्षात घेऊन बांगलादेश क्रिकेट मंडळाने खेळाडूंच्या संपाबाबत तातडीने बैठक बोलावली खरी, पण या बैठकीत काहीच ठोस निर्णय झाला नसल्याने बांगलादेश क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याबाबतची अनिश्‍चितता वाढली आहे.

ढाका / नवी दिल्ली ः अवघ्या आठवड्यावर आलेला भारत दौरा लक्षात घेऊन बांगलादेश क्रिकेट मंडळाने खेळाडूंच्या संपाबाबत तातडीने बैठक बोलावली खरी, पण या बैठकीत काहीच ठोस निर्णय झाला नसल्याने बांगलादेश क्रिकेट संघाच्या भारत दौऱ्याबाबतची अनिश्‍चितता वाढली आहे.

बांगलादेश खेळाडूंनी संपावर जात असल्याचा इशारा दिल्यानंतर लगेचच बांगलादेश क्रिकेट मंडळाची तातडीची कार्यकारिणी बैठक झाली. त्या बैठकीनंतर बांगलादेश मंडळाचे अध्यक्ष नझमुल हसन यांनी खेळाडूंच्या संपामागे एक मोठा कट आहे, त्यामागे कोण आहे हे आम्ही नक्की शोधून काढू असे सांगितले; मात्र खेळाडूंच्या संपाबाबत उपाययोजना सांगितल्या नसल्याचे वृत्त ढाक्‍यातून प्रसिद्ध होणाऱ्या डेली स्टारने दिले आहे.

बांगलादेशचे क्रिकेटपटू आपल्याला ब्लॅकमेल करीत असल्याचा दावा मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी केला, पण त्याच वेळी त्यातील काही सदस्यांनी खेळाडूंच्या प्रश्‍नांची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठी नक्की प्रयत्न करू असे सांगितले. खेळाडूंनी त्यांचे प्रश्‍न आमच्यासमोर कधीच मांडले नाहीत. आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होण्यापूर्वी त्यांनी आमच्याशी चर्चा करायला हवी होती, असे बांगलादेश मंडळाचे संचालक जलाल युनुस यांनी सांगितले.

एकंदरीत सध्या तरी बांगलादेश मंडळातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आक्रमकता पाहता हा प्रश्‍न लवकर सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. खेळाडू थेट माध्यमांकडे गेल्याने पदाधिकारी जास्त चिडले आहेत, असे सांगितले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bangladesh cricket teams india tour in jeopardy