बांगलादेशची डरकाळी; दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी सहज विजय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 जून 2019

परिपूर्ण सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना बांगलादेश क्रिकेट संघाने विश्‍वकरंडकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात जारदार डरकाळी फोडली. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव केला.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : परिपूर्ण सांघिक खेळाचे प्रदर्शन करताना बांगलादेश क्रिकेट संघाने विश्‍वकरंडकाच्या आपल्या पहिल्याच सामन्यात जारदार डरकाळी फोडली. त्यांनी रविवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव केला. शकिब अल हसन आणि मुशफिकूर रहिम यांच्या अर्धशतकी खेळीनंतर गोलंदाजांनी दाखवलेला संयम त्यांच्या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. दक्षिण आफ्रिकेचा हा सलग दुसरा पराभव ठरला. यामुळे आता त्यांचा पुढील प्रवास नक्कीच कठिण होणार आहे. 

प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यावर बांगलादेशाने 50 षटकांत 6 बाद 330 धावा केल्या. यात मुशफिकूर रहिम (78) आणि शकिब अल हसन (75) यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा डाव छोट्या छोट्या भागीदारीने फुलत असतानाच फलंदाजांच्या हाराकिरीने 50 षटकांत 8 बाद 309 असा मर्यादित राहिला. बांगलादेशाच्या मुस्तफीझूर रहिमने तीन, तर महंमद सईफुद्दिनने दोन गडी बाद केले. 

आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून छोट्या छोट्या भागीदारी होत राहिल्या. पण, त्या फुलल्या कधीच नाही. डी कॉक-मार्करम यांची सलामी फुलणार वाटत असतानाच डी-कॉक बाद झाला. मार्करम-डु प्लेसी भागीदारी बहरत असताना मार्करम परतला. धावगतीचे समीकरण साधताना कर्णधार डु प्लेसीस (62) अर्धशतकानंतर बाद झाला. त्यानंतर पुन्हा मिलर-डुस्सेन, डुस्सेन-ड्युमिनी भागीदारी फलत असतानाच कोमजल्या. प्रतिस्पर्धी फलंदाज धावांसाठी धडपडत असतानाच बांगलादेशाच्या गोलंदाजांनी आव्हानात्मक धावसंख्येचा बचाव करताना दाखवलेला संयम महत्त्वाचा ठरला. धावांच्या गतीचे दडपण वाढल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी निर्णायक घाव घातला. 

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्याचा अचूक फायदा बांगलादेशाच्या फलंदाजांनी उठवला. त्यांच्याकडून शकिब अल हसन आणि मुशफिकूर रहिम आपल्या अर्धशतकाचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयशी ठरले. पण, त्यांच्या प्रत्येक फलंदाजांने दिलेल्या योगदानामुळे त्यांचे आव्हान उभे राहिले. सुरवातीच्या हवमानाचा फायदा उठविण्यासाठी दक्षिण आफ्रिका कर्णधार डू प्लेसि याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, तमिम इक्‍बालची झटपट मिळालेली विकेट वगळता त्यांचे सगळे फासे उलटेच पडले. आक्रमकता हाच उत्तम बचाव असे धोरण ठेवत बांगलादेशाच्या प्रत्येक फलंदाजाने चेंडूला धाव हे समीकरण धरूनच फलंदाजी केली आणि त्याचे परिणाम त्यांना योग्य मिळाले. 

सौम्या, शकिब आणि मुशफिकूर यांनी बांगलादेशाचा डाव बांधला. यातही सौम्या बाद झाल्यावर शकिब आणि मुशफिकूर यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली 142 धावांची भागीदारी निर्णायक ठरली. शकिब आणि मुशफिकूर खेळत असतानाच बांगलादेशाला त्रिशतकी मजल खुणावू लागली होती. पण, शकिब (75), मोहमंद मिथुन (21) आणि मुशफिकूर (78) ठराविक अंतराने बाद झाल्यावर महमुदुल्लाने मोसाडेक हुसेनला साथीला घेत सहा षटकांतच 66 धावांचा तडाखा देत बांगलादेशाचे तगडे आव्हान उभे केले. 

संक्षिप्त धावफलक : 
बांगलादेश 50 षटकांत 6 बाद 330 (मुशफिकूर रहिम 78 -80 चेंडू, 8 चौकार, शकिब अल हसन 75 -84 चेंडू, 8 चौकार, 1 षटकार, महमुदुल्ला नाबाद 46 - 33 चेंडू, 3 चौकार, 1 षटकार, मोसाडेक हुसेन 26 -20 चेंडू, 4 चौकार, अँडिल फेहलुकवायो 10-1-52-2, ख्रिस मॉरिस 10-0-73-2, इम्रान ताहिर 10-057-2) वि.वि. दक्षिण आफ्रिका 50 षटकांत 8 बाद 309 (फाफ डु प्लेसि 62 -53 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, एडन मार्करम 45 -56 चेंडू, 4 चौकार, जेपी ड्युमिनी 45 -37 चेंडू, 4 चौकार, व्हॅन डर डुस्सेन 41, महंमद सईफुद्दिन 8-1-57-2, मुस्तफीझूर रहमान 10-0-67-3)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bangladesh wins against South Africa by 21 runs