पीवायसी क्‍लबची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

पुणे - पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटना आयोजित दुसऱ्या वरिष्ठ गटाच्या अक्षय भोसले करंडक पुणे जिल्हा बास्केटबॉल अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात शिरीन लिमयेने केलेल्या सुरेख खेळाच्या जोरावर पीवायसी क्‍लबने अक्षय भोसले जिमखाना संघाचा २८-१४ असा चौदा गुणांनी पराभव केला.       

पुणे - पुणे जिल्हा बास्केटबॉल संघटना आयोजित दुसऱ्या वरिष्ठ गटाच्या अक्षय भोसले करंडक पुणे जिल्हा बास्केटबॉल अजिंक्‍यपद स्पर्धेत महिला गटात शिरीन लिमयेने केलेल्या सुरेख खेळाच्या जोरावर पीवायसी क्‍लबने अक्षय भोसले जिमखाना संघाचा २८-१४ असा चौदा गुणांनी पराभव केला.       
डेक्कन जिमखाना क्‍लबच्या बास्केटबॉल कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत महिला गटातील पीवायसी आणि अक्षय भोसले जिमखाना संघ या लढतीत पीवायसीच्या खेळाडूंचे पूर्ण वर्चस्व होते. मध्यंतरास पीवायसीकडे १४-६ अशी आठ गुणांची असलेली आघाडी वाढवत नेत त्यांनी विजय मिळविला. त्यात प्रमुख वाटा शिरीन लिमयेने केलेल्या (१८ गुण) जोरदार खेळाचा होता. पराभूत संघाच्या काजल चोप्राने (५ गुण) केलेली खेळी अपुरी पडली.  

पुरुष गटात पीवायसी क्‍लबने शार्प सेव्हन शूटर्स संघाचा ५९-११ असा ४८ गुणांनी पराभव केला. त्यात महत्त्वाचा वाटा दर्शन कांकरियाने नोंदविलेल्या १९ गुणांचा होता. त्याला सुमन उमेशने (१० गुण) सुरेख साथ दिली. पराभूत संघाच्या एम. मॅक्‍यूटने (९ गुण) दिलेली लढत अपुरी पडली. या सामन्यात पीवायसीचे वर्चस्व होते. त्यांनी मध्यंतरास ३३-२ अशी आघाडी मिळवली होती.

अक्षय भोसले (एबी) जिमखाना संघाने ‘ब’ संघाने एंजल्सचा ५२-४५ असा सात गुणांनी पराभव केला, या सामन्यात मध्यंतरास एंजल्सकडे २५-१७ अशी आठ गुणांची आघाडी होती. परंतु उत्तरार्धात ए. बी. जिमखाना संघाच्या आशिष पवार (१६ गुण) व हृषीकेश पवारने (८ गुण) केलेल्या जोरदार खेळाचा होता. पराभूत संघाच्या सौरभ तारूने (१७  गुण) दिलेली लढत अपुरी पडली. 

सोमणस ‘अ’ संघाने शिरूर तालुका संघावर ३७-१२ असा पंचवीस गुणांनी विजय मिळविला. मध्यंतरास त्यांच्याकडे १२-२ अशी दहा गुणांची आघाडी वाढवत नेत विजय मिळविला. त्यात महत्त्वाचा वाटा तेजस सोमण (१० गुण) व किरण गर्गेने (८ गुण) केलेल्या सुरेख खेळाचा होता. शिरूर तालुका संघाच्या मुकुंद कदमने (५ गुण) केलेली खेळी अपुरी पडली.  

व्हिन्सेंट ओल्ड बॉईज संघटनेने (व्होबा) महेश बालभवनचा (एमबीबी) ६०-३७ असा २३ गुणांनी सहजगत्या पराभव केला. या लढतीत मध्यंतरास व्होबाकडे २६-१८ अशी बारा गुणांची आघाडी मिळवली होती. त्यात प्रमुख वाटा अनिकेत जाधव (२४ गुण) व सर्फराझ इराणीचा (१६ गुण) होता.  एमबीबीकडून प्रणव बोडकेने (१७ गुण) केलेली खेळी अपुरी पडली.  

योगेश हुलगे (१६ गुण) व वृषभ आठवणेने (१४ गुण) उत्तरार्धात केलेल्या जोरदार खेळाच्या जोरावर भारती निवास सोसायटी (बीएनएस) ‘ब’ संघाने एसआरपीएफचा चुरशीच्या लढतीत ५९-५४ असा केवळ पाच गुणांनी पराभव केला. पराभूत संघाकडून संजय साळुंखेने (१५ गुण) केलेली खेळी अपुरी पडली. या सामन्यात मध्यंतरास एसआरपीएफकडे ३२-२७ अशा पाच गुणांची आघाडी मिळवली होती.

सोमणस ‘ब’ संघाने शार्प सेव्हन शूटर संघाचा ५९-३० असा २९ गुणांनी पराभव केला. या लढतीत मध्यंतरास सोमणस संघाकडे २७-१६ अशी अकरा गुणांची आघाडी मिळवली होती. यावेळी विजयी संघाकडून करण घोलप (१८ गुण) व गौरव शिंदे (१७ गुण) तर पराभूत संघाकडून एम. मॅक्‍यूटने (१४ गुण) सुरेख खेळ केला.

Web Title: basket ball pyc club