World Cup 2019 : रविवारी "मेन इन ब्ल्यू' दिसणार ऑरेंज जर्सीत

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जून 2019

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय क्रिकेट संघ यजमान इंग्लंडविरुद्धच्या लढतीत ऑरेंज रंगाची जर्सी घालणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. संघाची अधिकृत पोशाख उत्पादक कंपनी असलेल्या नायके इंडियाने हे जाहीर केले.

लंडन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय क्रिकेट संघ यजमान इंग्लंडविरुद्धच्या लढतीत ऑरेंज रंगाची जर्सी घालणार यावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. संघाची अधिकृत पोशाख उत्पादक कंपनी असलेल्या नायके इंडियाने हे जाहीर केले. फुटबॉलमध्ये कोणत्याही संघाचे अवे किट असते. मूळ किटमधील रंगसंगती प्रतिस्पर्धी संघाच्या किटशी मिळतीजुळती असेल तर या किटचा वापर केला जातो. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांच्या जर्सी निळ्या रंगसंगतीच्या आहेत.

इंग्लंड हा यजमान संघ आहे. त्यामुळे त्यांची जर्सी आकाशी रंगाचीच असेल. नायके कंपनीने ऑरेंज रंगाविषयी म्हटले आहे की, भारतीयांच्या नव्या पिढीपासून आणि राष्ट्रीय संघाच्या निर्भयपणे खेळ खेळण्याच्या मनोवृत्तीने या रंगाची प्रेरणा मिळाली. खेळ तसेच खेळाडूंच्या आधुनिक गरजा आणि चपळ हालचालींची आवश्‍यकता लक्षात घेऊन किटचे डिझाईन तयार करण्यात आले. कॉंग्रेसचा आक्षेप अन्‌ राजकीय वाद भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल होण्याआधीच ऑरेंज जर्सीचा वापर होईल असे वृत्त होते. त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नव्हता. ऑरेंज रंग हा तिरंग्यातील एका रंगासारखा असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाच्या वतीने टीका करण्यात आली होती.

क्रिकेटचेही भगवेकरण करण्याचा सत्ताधारी भाजपचा प्रयत्न असल्याचा दावा विरोधकांनी केला होता. त्यावर आयसीसीने खुलासा केला होता. बीसीसीआयला इतरही रंगांचा पर्याय देण्यात आला होता, त्यांच्याकडूनच ऑरेंज रंगाला पसंती मिळाली असे सांगण्यात आले. संघाच्या जुन्या टी-20 जर्सीत ऑरेंज रंग होता. त्यामुळे सर्वस्वी नवी रंगसंगती साधण्याऐवजी हा रंग निवडण्यात आला, जो चाहत्यांना परिचित आहे आणि त्यांना आपलासा वाटेल, अशी भूमिका असल्याचेही नमूद करण्यात आले होते.

ऑरेंज जर्सीची वैशिष्ट्ये

- सूक्ष्म जाळीदार कापडाची नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून बांधणी

- घाम शोषून घेणाऱ्या पॅचमुळे खेळाडूंचा दमसास वाढणार

- खांदा, छातीलगतचा भाग यांची नव्या पद्धतीने आखणी

- लवचिक क्रेस्ट, शिलाईसाठी कापड कापतानाचे कोन आणि बाजूच्या पट्ट्या अशी एकूण रचना जर्सीचे वजन आणखी कमी करणारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BCCI declares new Orange Jersey of Indian Cricket Team