बीसीसीआय निवडणूकीतील गांगुलीच्या सहभागास आक्षेप?

वृत्तसंस्था
मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019

भारतीय क्रिकेट मंडळाची लोढा समितीच्या शिफारसीनंतर प्रथमच होणारी निवडणूक मतदानापूर्वीच गाजणार अशीच चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीसाठी सादर झालेल्या मतदारांपैकी सौरव गांगुली, रजत शर्मा, ब्रिजेश पटेल, राजीव शुक्‍ला यांच्या नावासही आक्षेप असल्याची चर्चा आहे.

मुंबई / नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट मंडळाची लोढा समितीच्या शिफारसीनंतर प्रथमच होणारी निवडणूक मतदानापूर्वीच गाजणार अशीच चिन्हे दिसत आहेत. या निवडणुकीसाठी सादर झालेल्या मतदारांपैकी सौरव गांगुली, रजत शर्मा, ब्रिजेश पटेल, राजीव शुक्‍ला यांच्या नावासही आक्षेप असल्याची चर्चा आहे.

निवडणूक अधिकारी एन. गोपालस्वामी यांनी एकंदर बारा नावांना आक्षेप घेतला आहे. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. त्यांचा निर्णय निवडणूक अधिकारीच घेतील. जेमतेम दोन आठवड्यांवर निवडणूक आली आहे. त्यातील सादर नावांना मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे संजीव गुप्ता यांनी आक्षेप घेतला आहे. त्याशिवाय एकंदर प्रक्रिया पाहून निवडणूक अधिकाऱ्यांनी बारा नावे विचाराधीन टाकली असल्याचे सांगितले जात आहे.

विविध संघटनांनी पाठवलेल्या मतदारांबाबत आक्षेप घेण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत होती. आता आक्षेप घेतलेल्या नाबांबाबत गोपालस्वामी यांनी प्रशासकीय समितीचे मतही घ्यायचे ठरवले आहे. निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय न घेता, आक्षेप असलेल्या व्यक्ती तसेच संघटनांना भूमिका मांडण्याची संधी द्यायचे ठरवले आहे.

प्रशासकीय समितीने ठरवलेल्या नियमानुसार निवडणूक घेतलेल्या संघटनांच्या प्रतिनिधींचाच विचार निवडणूक अधिकारी करतील, असे सांगितले जात आहे. अर्थातच या सूत्रांनी महाराष्ट्र, हरियाणा, तमिळनाडू या संघटनांनी नियमांचे पालनच केले नसल्याचा दावा केला आहे. अर्थातच त्यामुळे रियाझ बागवान (महाराष्ट्र), मृणाल ओझा (हरियाणा) आणि एस. रामस्वामी (तमिळनाडू) यांच्याबाबतचा निर्णय जास्त अवघड असेल, असे सांगितले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bcci election : ganguly may be asked to stay away