"बीसीसीआय'ला अखेर स्वतःची जागा मिळाली

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

"बीसीसीआय'चे हंगामी सचिव अमिताभ चक्रवर्ती यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बंगळूरमध्येच "बीसीसीआय'ला स्वतःची जागा मिळविण्यात यश आले असे सांगून खन्ना यांनी भविष्यात आणखी काही स्वतःच्या जागा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही सांगितले

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि कर्नाटक सरकार यांच्यामध्ये जमिनीच्या ताब्यावरून सुरू असलेल्या वादावर अखेर शुक्रवारी पडदा पडला. त्यामुळे आता "बीसीसीआय'ला बंगळूर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीसाठी (एनसीए) स्वतःची जागा उपलब्ध झाली.

क्रिकेटसाठी "बीसीसीआय'ची ही पहिलीच स्वतःच्या मालकीची जागा असेल. कर्नाटक सरकारकडून मिळालेली ही नवी जागा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून खूपच जवळ आहे. बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना म्हणाले, ""आणखी 25 एकर जागा मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्यात येईल आणि दोन वर्षांत येथे अकादमी सुरू होईल.''

या जागेबाबत वाद सुरू असल्यामुळे गेली दोन वर्षे "बीसीसीआय' अत्याधुनिक सोयीसुविधांनी उपलब्ध अशा नव्या जागेचा शोध घेत होते. सध्या चिन्नास्वामी स्टेडियमवरच "एनसीए'चे काम चालते. पण, गेली काही वर्षे अनेक वादांमुळे तेथे केवळ क्रिकेटपटूंसाठी पुनर्वसन कार्यक्रमच राबवला जात होता. यामुळे पदच्युत अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आपल्या कालावधीत "एनसीए' पुणे किंवा धरमशाला येथे हलवण्याचा पर्याय खुला ठेवला होता. मात्र, "बीसीसीआय'चे हंगामी सचिव अमिताभ चक्रवर्ती यांच्या विशेष प्रयत्नांमुळे बंगळूरमध्येच "बीसीसीआय'ला स्वतःची जागा मिळविण्यात यश आले असे सांगून खन्ना यांनी भविष्यात आणखी काही स्वतःच्या जागा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही सांगितले.

Web Title: BCCI set to own its first property