बांगलादेशवर भारताची आठ विकेट राखून  मात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 डिसेंबर 2017

बेळगाव - एकदिवसीय मालिकेतील विजयी परंपरा कायम राखत भारताच्या महिला अ संघाने टी-20 सामन्यातही बांगलादेश अ संघाचा 8 विकेट राखून दणदणीत पराभव केला. भारताने आता तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

बेळगाव - एकदिवसीय मालिकेतील विजयी परंपरा कायम राखत भारताच्या महिला अ संघाने टी-20 सामन्यातही बांगलादेश अ संघाचा 8 विकेट राखून दणदणीत पराभव केला. भारताने आता तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कर्णधार व फिरकी गोलंदाज अनुजा पाटील, राधा यादव यांनी किफायतशीर गोलंदाजी करीत विजयात मोलाचा वाटा उचलला. 

बेळगावातील केएससीए मैदानावर झालेला हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. बांगलादेशाची कर्णधार जहांआरा आलमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या षटकापासून भारतीय गोलंदाजानी खिंडार पाडले. त्यांचा डाव 17 षटकांत 57 धावांतच आटोपला. फरजाना एचने 2 चौकारांसह 14, रुमाना अहमदने 1 चौकारासह 24, लता मंडलने 1 चौकारासह 10 धावा केल्या. त्यांच्या व्यतिरिक्त बांगला देशच्या कोणत्याही फलंदाजाला दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारतातर्फे कर्णधार अनुजा पाटीलने 9 धावांत 2, राधा यादवने 4 धावांत 2 तर पूजा वास्त्रकर, टी. पी. कनवार, डी. हेमलता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. 

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने 10.4 षटकांत 2 बाद 60 धावा करीत सामना 8 गड्यांनी जिंकला. वनिता व्ही.आर.ने 3 चौकारांसह 14, एस. मेघनाने 4 चौकारांसह 30 तर डी. पी. वैधने 2 चौकारांसह 11 धावा करुन विजयात मोलाचे योगदान दिले. बांगलादेशतर्फे खडीजा तुल कुब्रा, रुमाना अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. तत्पूर्वी सकाळी पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, केएससीएचे धारवाड विभागीय समन्वयक बाबा भुसद यांच्या हस्ते सामन्याचे उद्‌घाटन करण्यात आले. अविनाश पोतदार यांनी पाहुणे, सामनाधिकारी व पंचांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी दीपक पवारही उपस्थित होते. 

संक्षिप्त धावफलक : 
बांगलादेश "अ' : 17 षटकांत सर्वबाद 57. फरगना एच. 14, रुमान अहमद 24, लता मंडल 10 (अनुजा पाटील 9/2, राधा यादव 4/2, पूजा व्ही. 10/1, टी. पी. कंवर 6/1, डी. हेमलता 16/1) 
भारत महिला "अ' : 10.4 षटकांत 2 बाद 60. वनिता व्ही. आर. 14, एस. मेघना 30, डी. पी. वैद्य 11 (खडीजा तुलकुब्रा 16/1, रूमाना अहमद 23/1) 

अनुजा लहानपणापासूनच क्रिकेटवेडी : अरुण पाटील 
आजचा सामना पाहण्यासाठी भारतीय संघाची कर्णधार अनुजा पाटीलचे वडील अरुण, आई शोभा, काका महादेव व परिवार खास कोल्हापूरहून बेळगावात आले होते. सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना अरुण यांनी मुलीचे तोंड भरुन कौतुक केले. ते म्हणाले, अनुजा लहानपणापासून क्रिकेटवेडी आहे. सातवीपासूनच तिने क्रिकेटचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला. मी व तिचे काका महादेव यांच्याबरोबर सतत मैदानात तिच्यासोबत असू. फायटर्स क्‍लब, शाहू स्पोर्टस क्‍लब आदी संघातून खेळत तिने आधी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे. भारतीय एकदिवसीय संघातही स्थान मिळवित तिने देशाचे नाव उज्ज्वल करावे, अशी आशा त्यांनी व्यक्‍त केली. 

कर्णधार अनुजा म्हणाली, देशासाठी अल्पावधीतच भरीव कामगिरी केली आहे. त्यात सातत्य राखण्याचा माझा प्रयत्न राहील. बेळगावात खूप गुणवत्ता आहे. मात्र, पालक व प्रशिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन करणे गरजेचे आहे. केएससीए मैदान सुंदर आहे. हवामान स्वच्छ आहे. इथल्या सुविधा आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळासाठी पोषक आहेत, असे तिने स्पष्ट केले. 

Web Title: Belgaum News T-20 series