अपयशी गोलरक्षक नेऊरवर विश्‍वास विश्‍वकरंडकासाठी जर्मनी, बेल्जियम संघांची घोषणा 

वृत्तसंस्था
मंगळवार, 5 जून 2018

मॅन्युएल नेऊर हा आठ महिने दुखापतीमुळे स्पर्धात्मक फुटबॉलपासून दूर होता. पुनरागमनाच्या सामन्यात अपयशी ठरला, तरीही जर्मनीचे मार्गदर्शक जोशीम लोव यांनी तोच आपला प्रथम पसंतीचा गोलरक्षक असेल, असे जाहीर केले. 

बर्लिन - मॅन्युएल नेऊर हा आठ महिने दुखापतीमुळे स्पर्धात्मक फुटबॉलपासून दूर होता. पुनरागमनाच्या सामन्यात अपयशी ठरला, तरीही जर्मनीचे मार्गदर्शक जोशीम लोव यांनी तोच आपला प्रथम पसंतीचा गोलरक्षक असेल, असे जाहीर केले. 

नेऊर याला संघात ठेवताना लेरॉय सॅन याला वगळण्यात आले. प्रीमियर लीगमध्ये त्याने प्रभावी कामगिरी केली होती; पण त्याच्याऐवजी जर्मनी लीगमध्ये यशस्वी ठरलेल्या ज्युलियन ब्रॅंड्‌त याला पसंती देण्यात आली. संघातील खेळाडूंची संख्या कमी करणे, त्यांना हा निर्णय सांगणे, त्यांचे सांत्वन करणे खूपच त्रासदायक असते, असे लोव यांनी सांगितले. 

लोव यांनी 13 खेळाडूंना विश्‍वकरंडक पदार्पणाची संधी दिली आहे. त्याचवेळी गतस्पर्धेत खेळलेल्या नऊ जणांनीच स्थान राखले आहे. वर्ल्ड कप न खेळलेल्या खेळाडूंत मार्विन प्लॅटेनहार्ड हा सर्वांत अननुभवी आहे. तो जर्मनीकडून यापूर्वी केवळ सहा लढती खेळला आहे. अर्थात, लोव ऐनवेळी संघात काही बदल करू शकतील, असा अभ्यासकांचा अंदाज आहे. स्पर्धेतील आपल्या पहिल्या लढतीपूर्वी 24 तास अगोदर संघात बदल करण्याची मुभा असते. जर्मनीची स्पर्धेतील पहिली लढत 16 जूनला आहे. 

कोम्पनीचा संघात समावेश 
ब्रसेल्स ः बेल्जियमने व्हिन्सेंट कोम्पनी याचा विश्‍वकरंडकाच्या अंतिम संघात समावेश केला; पण लॉरेंत किमान याला राखीव खेळाडू ठेवतच हा संघ जाहीर केला. डेन्मार्कने त्यामुळे 23 ऐवजी 24 खेळाडूंचा संघ जाहीर केला. विश्‍वकरंडक स्पर्धा नियमानुसार स्पर्धेतील पहिल्या लढतीपूर्वी 24 तास अगोदर 23 खेळाडूंचा अंतिम संघ जाहीर करणे बंधनकारक आहे. डेन्मार्कची सलामीची लढत 18 जूनला आहे. 

अल आबेदला वगळले 
सौदी अरेबियाने विंगर नवाफ अल आबेदला वगळले आहे. पात्रता स्पर्धेत, तसेच दोन वर्षांपूर्वीच्या आशिया स्पर्धेत त्याने प्रभावी कामगिरी केली होती. पण त्याला काही महिन्यांपासून दुखापतीने सतावले होते. त्याच्यासह पात्रता स्पर्धेसाठी सातत्याने पसंती दिलेल्या गोलरक्षक आसफ क्वार्नी, दोन बचावपटू आणि एका मध्यरक्षकास वगळण्यात आले. 

सालाहला खेळण्याची आशा 
दुखापतीतून सावरत असलेला मोहंमद सालाह विश्‍वकरंडक स्पर्धा खेळण्याची आशा बाळगून आहे. चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील अंतिम लढत खेळताना तो जखमी झाला होता. आता त्याने जिम्नॅशियममध्ये तयार होत असतानाच फोटो ट्‌विट करताना गुड फिलिंग असे म्हटले आहे. त्याला तीन आठवडे ब्रेक घ्यावा लागेल, अशी भीती इजिप्त फुटबॉल पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 
 

Web Title: belgium football team selected for world cup