Pro Kabaddi 2019 : बंगालचा तमीळवर सहज विजय

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

 फॉर्मात असलेल्या बंगाल वॉरियर्सने एकापेक्षा एक सरस खेळाडू असलेल्या तमीळ थलैवाचा 36-26 असा पराभव करून प्रो कबड्डीतील आपली वाटचाल कायम ठेवली.

नवी दिल्ली - फॉर्मात असलेल्या बंगाल वॉरियर्सने एकापेक्षा एक सरस खेळाडू असलेल्या तमीळ थलैवाचा 36-26 असा पराभव करून प्रो कबड्डीतील आपली वाटचाल कायम ठेवली. आजच अर्जुन पुरस्काराचा स्वीकार केल्यानंतर मैदानात उतरणाऱ्या अजय ठाकूरने 11 गुणांची कमाई केली; पण इतरांची साथ त्याला मिळाली नाही.

बंगालकडून के. प्रपंजनने 10; तर मनिंदरने 9 गुण मिळवत चढायांत प्रभाव पाडला. त्यांच्या आक्रमणापुढे तमीळचे नामवंत बचावटू मनजित चिल्लर, मोहित चिल्लर आणि रणसिंग निष्प्रभ ठरले. बंगालच्या रिंकू नरवाल आणि बलदेव सिंग यांनी पकडींत चांगली कामगिरी त्यामुळे अजय ठाकूरचा अपवाग वगळता राहुल चौधरी अपयशी ठरला. राहुलला पाच चढायांत अवघा एकच गुण मिळवता आला. 

राहुल चौधरी अपयशी ठरत असल्यामुळे शब्बीर बापू अजय ठाकूरला साथ देत होता. पण तमीळसाठी ते पुरेसे ठरले नाही. बंगालने 10 सामन्यांतून पाच विजय मिळवत चौथे स्थान मिळवले आहे. तर तमीळचे 10 सामन्यातून पाच पराभव झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bengal Warriors beats Tamil Thalaivas