कॅडेट कुस्तीत अंशुला सुवर्ण

वृत्तसंस्था
रविवार, 13 मे 2018

कॅडेट गटाच्या आशियायी अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत भारताने एका सुवर्णपदकासह एकूण सात पदकांची कमाई केली. यात हरियानाची अंशु मुलींच्या 61 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. 

ताश्‍कंद (उझबेकिस्तान) - कॅडेट गटाच्या आशियायी अजिंक्‍यपद कुस्ती स्पर्धेत भारताने एका सुवर्णपदकासह एकूण सात पदकांची कमाई केली. यात हरियानाची अंशु मुलींच्या 61 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची मानकरी ठरली. 

स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांत भारताने आतापर्यंत एकूण 13 पदकांची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी भारताने मुलांच्या ग्रीको रोमन प्रकारात एक रौप्य आणि दोन ब्रॉंझपदकांची कमाई केली होती. 

मुलींच्या गटात नोर्डिक पद्धतीत झालेल्या पहिल्या लढतीत अंशुने चीनच्या क्वीन जावो हिचा प्रतिकार 8-4 असा मोडून काढला. त्यानंतर तिने मंगोलियाच्या बकटहुयाग हिला गुणांवरच 4-1 असे सहज पराभूत केले. नव्या पद्धतीनुसार झालेल्या क्रॉस सेमी फायनलमध्ये तिने उझबेकिस्तानच्या अझीझेव हिच्याविरुद्ध कमालीचा आक्रमक खेळ करून तिला एकतर्फी लढतीत 10-0 असे हरवले. अंतिम फेरीत तिने जपानच्या रुक नातमीविरुद्ध कमालीचा संयमी खेळ करून 4-0 असा विजय मिळवून सुवर्णपदकावर नाव कोरले. 

मुलींच्या गटात अन्य वजनी गटात संजू देवी (46 किलो), मीनाक्षी (53 किलो), अंशु गुर्जर (69 किलो), तर मुलांच्या ग्रीको-रोमन प्रकारात विकास (65 किलो), दीपक (71 किलो), रवी मलिक (80 किलो) हे ब्रॉंझपदकाचे मानकरी ठरले. 

Web Title: in cadet wrestling anshu wins gold medal