बांगलादेशचे भारतापुढे 265 धावांचे आव्हान

वृत्तसंस्था
गुरुवार, 15 जून 2017

31 धावा व दोन बाद, अशी अवस्था झालेल्या बांगलादेशला इक्‍बाल व रहीम यांनी सावरले. सुरुवातीला सावधपणे खेळ करत एकेरी-दुहेरी धावांवर भर दिलेल्या या जोडीने हळुहळू धावसंख्या वाढविण्यास सुरुवात केली

बर्मिंगहॅम - चॅंपियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात आज (गुरुवार) बांगलादेशने भारतापुढे 265 धावांचे आव्हान ठेवले. सलामीवीर तमीम इक्‍बाल (70 धावा, 82 चेंडू) व मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज मुशफिकूर रहीम (61 धावा, 85 चेंडू) यांच्यात झालेली शतकी भागीदारी हे बांगलादेशच्या धावसंख्येमधील प्रमुख वैशिष्ट्य ठरले.

सामन्याच्या सुरुवातीसच भारताच्या भुवनेश्‍वर कुमारने ( 53 धावा, 2 बळी) बांगलादेशला दोन धक्के दिले. भुवनेश्‍वर याने सौम्य सरकार (0 धावा, 2 चेंडू) याचा त्रिफळा उडवला; तर धोकादायक पद्धतीने खेळणाऱ्या सब्बीर रहमान (19 धावा, 21 चेंडू) याला पॉईंटला रवींद्र जडेजाकडे झेल द्यावयास भाग पाडले. यावेळी 31 धावा व दोन बाद, अशी अवस्था झालेल्या बांगलादेशला इक्‍बाल व रहीम यांनी सावरले. सुरुवातीला सावधपणे खेळ करत एकेरी-दुहेरी धावांवर भर दिलेल्या या जोडीने हळुहळू धावसंख्या वाढविण्यास सुरुवात केली. मुशफिकुर व इक्‍बाल या जोडीने केलेल्या शतकी भागीदारीमुळे बांगलादेशच्या धावसंख्येस खरा आकार आला.

भारतीय गोलंदाजांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत असतानाच जम बसलेला इक्‍बाल केदार जाधव याच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून त्रिफळाचीत झाला. यानंतर आलेल्या शकीब अल हसन (15 धावा, 23 चेंडू) याला जडेजाने यष्टिरक्षक महेंद्रसिंह धोनीकरवी परतविले; तर संयम गमाविलेला रहीमही जाधव याच्या गोलंदाजीवर भारतीय कर्णधार विराट कोहलीकडे झेल देऊन बाद झाला. यामुळे 154/2 अशा भक्कम स्थितीत असलेल्या बांगलादेशची अवस्था 179/5 अशी झाली. भारताचा मुख्य फिरकी गोलंदाज रवीचंद्रन आश्‍विन (10 षटके - 54 धावा) याला आज बांगला फलंदाजांनी आजिबात यश मिळवू दिले नाही.

रहीम याच्यानंतर आलेल्या महमदुल्लाह (21 धावा, 25 चेंडू), मोसादेक हुसेन (15 धावा, 25 चेंडू) व मशरफे मुर्तझा (30 धावा, 25 चेंडू) यांनी छोटेखानी खेळी करत बांगलादेशची धावसंख्या आणखी वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजाविली. जसप्रीत बुमराह (40 धावा, 2 बळी) याने महमदुल्लाह व हुसेन यांना बाद केले; मात्र अखेरच्या टप्प्यात मुर्तझाने केलेल्या फटकेबाजीमुळे बांगलादेशला अडीचशेचा टप्पा ओलांडण्यात यश आले. नशीबाची साथ मिळालेल्या मुर्तझाने पाच चौकार मारत भारतीय गोलंदाजांची परीक्षा पाहिली

Web Title: Champions Trophy: Bangladesh scores 264