प्रगानानंदा बनला भारताचा सर्वांत लहान ग्रॅंड मास्टर

वृत्तसंस्था
सोमवार, 25 जून 2018

चेन्नईतील आर. प्रगानानंदा याने इटलीच्या लुका मोरोनेला पराभूत करत बुद्धिबळातील सर्वांत लहान ग्रॅंड मास्टर बनत शनिवारी इतिहास नोंदवला. हा किताब पटकावणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. 

चेन्नई : आर. प्रगानानंदा याने इटलीच्या लुका मोरोनेला पराभूत करत बुद्धिबळातील सर्वांत लहान ग्रॅंड मास्टर बनत शनिवारी इतिहास नोंदवला. हा किताब पटकावणारा तो जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. 

तो वयाच्या 12 वर्षे, दहा महिने आणि 13 दिवसांचा असताना त्याने हा किताब मिळवला तर 1990 मध्ये युक्रेनचा सर्जे कर्जाकिन हा वयाच्या 12 वर्षे, सात महिन्यांचा असताना पहिला लहान ग्रॅंड मास्टर बनला होता. इटालीमधल्या ऑर्टीसेई येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रगानानंदा अतिशय सुंदर बुद्धिबळ खेळत इराणच्या आर्यन घोलामी याला पराभूत केले. तर आठव्या फेरीत त्याने लुका मोरोनेवर मात केली. 

जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन हा वयाच्या 13व्या वर्षी ग्रॅंड मास्टर झाला तर विश्वनाथ आनंदने हा किताब वयाच्या १८व्या वर्षी पटकावला. भारताचा सगळ्यात तरूण ग्रँड मास्टर असलेला परीमार्जन नेगी, ज्यानं हा किताब १३ वर्षे ४ महिन्याचा असताना पटकावला होता त्याला मागे टाकत प्रगानानंदाने भारतातील सर्वात लहान ग्रॅंड मास्टरचा सन्मान मिळवला आहे. 

प्रगानानंदाचे प्रशिक्षक आर. बी. रमेश याविषयी बोलताना म्हणाले, ''त्याच्यावर कोणतेही दडपण येणार नाही व तो मोकळ्या मनाने खेळेल याची आम्ही काळजी घेतली. त्याच्या बुद्धिबळ प्रवासाची ही सुरुवात आहे. वर्ल्ड चॅम्पियन बनून आनंद व कार्लसनच्या पंगतीत बसणं हे त्याचं ध्येय असेल.''

वेलकम टू द क्लब, सी यू सुन असे ट्विट करत आनंदने त्याचे कौतुक केले आहे. 

Web Title: Chennai boy is world’s 2nd-youngest Grandmaster