सेंट लुईस स्पर्धेत आनंदला जेतेपद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

हिकारू हा पांढरी मोहरी असताना प्रभावी चाली करतो, हे आनंद पुरेपूर जाणून आहे, त्यामुळेच त्याने या लढतींच्यावेळी प्रतिस्पर्ध्यांच्या मोहऱ्यांची कोंडी करण्यावरच भर दिला आणि ते योग्यच होते. 
- गॅरी कास्पारोव, स्पर्धेचे समालोचन करताना

मुंबई - विश्‍वनाथन आनंदने सेंट लुईसला झालेल्या चौरंगी बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. बुद्धिबळाच्या तीनही प्रकारांत झालेल्या सर्वोत्तम चौघातील या स्पर्धेत आनंदने अन्य स्पर्धकांना किमान एका गुणाने मागे टाकत बाजी मारली.

आनंदचा सहभाग असल्यामुळे या स्पर्धेस जागतिक विजेतेपदाच्या लढतीच्या तोडीचे महत्त्व मिळत होते. दशकभरात प्रथमच आनंदविना जगज्जेतेपदाची लढत होत आहे. त्याची निराशा बाजूला ठेवत आनंदने सेंट लुईस स्पर्धेत बाजी मारली. त्याने हिकारू नाकामुरा आणि फॅबिआनो करुना या टॉप टेनमध्ये खेळाडूंना मागे टाकत बाजी मारली.

क्‍लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्‌झ या तीन प्रकारांत बुद्धिबळ लढती होतात. अर्थात चालींसाठी असलेल्या वेळेनुसार हे प्रकार आहेत. आनंदने क्‍लासिकल प्रकारात ३.५, रॅपिडमध्ये ४.५ आणि ब्लिट्‌झ प्रकारात सात गुण मिळवले. त्याने एकंदर पंधरा गुण मिळवताना दुसऱ्या क्रमांकावरील नाकामुरास एका गुणाने मागे टाकले. नाकामुरा आनंदला ब्लिट्‌झ प्रकारातच अर्ध्या गुणाने मागे टाकू शकला; पण आनंदने क्‍लासिकल प्रकारात अर्ध्या आणि रॅपिडमध्ये एका गुणांची आघाडी घेतली होती. आनंदचा २०१० च्या जागतिक लढतीतील प्रतिस्पर्धी वासेलीन टोपालोव चौथा आला. आनंदने जेतेपदासह साठ हजार डॉलरची कमाई केली.

Web Title: chess competition win viswanathan anand

टॅग्स