राज्याची असंलग्नता रोखण्यात बुद्धिबळ महासंघही अपयशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मुंबई - राज्य बुद्धिबळ संघटनेतील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ पदाधिकाऱ्यांनी अखेरच्या मिनिटापर्यंत केलेले प्रयत्न विफल ठरले. यामुळे अखेर भारतीय बुद्धिबळ महासंघास राज्य संघटनेची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय नाइलाजास्तवच घ्यावा लागला, असेच समोर येत आहे.

मुंबई - राज्य बुद्धिबळ संघटनेतील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ पदाधिकाऱ्यांनी अखेरच्या मिनिटापर्यंत केलेले प्रयत्न विफल ठरले. यामुळे अखेर भारतीय बुद्धिबळ महासंघास राज्य संघटनेची संलग्नता रद्द करण्याचा निर्णय नाइलाजास्तवच घ्यावा लागला, असेच समोर येत आहे.

राज्य बुद्धिबळ संघटनेस सप्टेंबरमध्ये भारतीय महासंघाने नोटीस बजावली होती. त्यानंतर मुदत वाढवून दिली; तरीही डिसेंबरपर्यंत तडजोड होऊ शकली नाही. बुद्धिबळ स्पर्धा घेणाऱ्या राज्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यामुळे राज्य संघटनेची संलग्नता टाळण्यासाठी मध्यवर्ती परिषदेच्या बैठकीनंतरही प्रयत्न झाले. भारतीय बुद्धिबळ पदाधिकाऱ्यांनी त्यांना एका रूममध्ये बसून चर्चा करण्यास भाग पाडले; पण तरीही तडजोड झाली नाही.

भारतीय बुद्धिबळ महासंघाचे मानद सचिव व्ही. हरिहरन, डी. व्ही. सुंदर यांनी याबाबत तडजोडीचे प्रयत्न केले. त्यांनी राज्य संघटनेच्या दोन्ही गटांना समोरासमोर बसवले; एवढेच नव्हे, तर आम्ही संघर्ष मिटवण्यासाठी एकत्र येऊ, असेही सांगितले; पण त्याचाही काही उपयोग झाला नाही, असे चेन्नईतील बैठकीसाठी उपस्थित राहिलेल्या गिरीश चितळे यांनी सांगितले.

बुद्धिबळात आक्रमण सुकर करण्यासाठी खेळाडू एखाद्या मोहऱ्याचा बळी देण्याची चाल करतात. येथे राज्य संघटनेचे पदाधिकारी वाद वाढवून आपली संलग्नता रद्द करण्याचा निर्णय ओढवून घेत होते, तर त्याच वेळी भारतीय पदाधिकारी ती कशी कायम राहील, याकडे लक्ष देत होते, अशीच राज्यातील बुद्धिबळप्रेमींची भावना आहे.

आता या कारवाईचा राज्यातील बुद्धिबळावर परिणाम होऊ नये, हाच आमचा प्रयत्न असेल. आता लवकरच अस्थायी समितीची स्थापना होईल. त्यांच्या साथीत राज्यातील खेळाच्या प्रगती थांबू नये, याकडे लक्ष देण्यात येईल. त्याचबरोबर यात कोणतेही राजकारण होणार नाही, याकडेही लक्ष देणार आहोत; पण आता जर हे सुरूच राहिले, तर त्यापासून दूर व्हावे लागेल. केवळ खेळाच्या प्रेमासाठी संघटनेत आलो आहोत. या संदर्भातील राजकारणापासून तसेच ते करणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहण्याचाच प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

Web Title: chess organisation