इलेक्‍ट्रिशियनच्या मुलीची ऑलिंपिक पात्रता

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

मध्य प्रदेश क्रीडा विभागातील इलेक्‍ट्रिशियनची मुलगी असलेल्या चिंकी यादवने आशियाई नेमबाजी स्पर्धेत ऑलिंपिक पात्रतेचा वेध घेतला. तिने 25 मीटर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठत ऑलिंपिक पात्रता मिळवली, पण तिला पदकापासून दूर राहावे लागले. 

मुंबई : मध्य प्रदेश क्रीडा विभागातील इलेक्‍ट्रिशियनची मुलगी असलेल्या चिंकी यादवने आशियाई नेमबाजी स्पर्धेत ऑलिंपिक पात्रतेचा वेध घेतला. तिने 25 मीटर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी गाठत ऑलिंपिक पात्रता मिळवली, पण तिला पदकापासून दूर राहावे लागले. 

चिंकीने पात्रता फेरीत 588 गुणांची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली. तिने अखेरच्या फेरीत अचूक शंभर गुणांचा वेध घेतला होता. अंतिम फेरीसाठी पात्र ठरलेल्या आठपैकी चौघींनी यापूर्वीच पात्रता मिळवली होती. त्यामुळे अंतिम फेरी गाठलेल्या चिंकीसह अन्य चौघींना ही पात्रता मिळाली. याच प्रकारात राही सरनोबतने म्युनिच विश्‍वकरंडक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकत भारताची पहिली ऑलिंपिक पात्रता मिळवली होती. 

अंतिम फेरीत चिंकीला 116 गुणांसह सहाव्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले. "ऑलिंपिक पात्रता मिळवल्यामुळे मी किती खूश आहे हे सांगणे अवघड आहे. पात्रता फेरीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केल्याचेही नक्कीच समाधान आहे. या कामगिरीचे श्रेय माझ्या सर्व मार्गदर्शकांना विशेषतः जसपाल राणा यांना आहे,' असे चिंकीने सांगितले. चिंकीच्या सहकारी अन्नू राज सिंग (575) आणि नीरज कौर (572) या अंतिम फेरीपासून खूपच दूर राहिल्या. त्याच वेळी सरावाच्या स्पर्धेत खेळताना राहीने 589; तर मनू भाकरने 584 गुणांचा वेध घेतला. 

पदक धडाका कायम 
- पन्नास मीटर रायफल प्रोनच्या महिला सांघिकमध्ये सुवर्ण. तेजस्विनी सावंत, अंजुम मौदगिल आणि काजल सैनीचा 1864.8 गुणांचा वेध. 
- याच प्रकारात पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत रौप्य. संजीव राजपूत, शुभंकर प्रामाणिक आणि तरुण यादवकडून 1865.1 गुणांचा वेध. 
- दहा मीटर एअर रायफलच्या युवा गटात मुलांना सांघिक सुवर्ण. रुद्राक्ष पाटील, टी आर स्रीजय आणि पार्थ मखिजाकडून 1871 गुणांची कमाई. 
- दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात नवीनचा 241.2 गुणांसह सुवर्णवेध. नवीनने मोनू कुमार आणि नावेद चौधरीसह 1710 गुण मिळवत सांघिक सुवर्णपदक जिंकले. 
- 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूलच्या पुरुषांच्या स्पर्धेत उदयवीर सिद्धूला रौप्य तर उदयवीर, विजयवीर आणि गुरप्रीत सिंगचे सांघिक सुवर्ण 
- 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तूलच्या कुमार गटात हर्ष गुप्ताला ब्रॉंझ तसेच हर्ष, दिलशान केल्लेय आणि हर्षवर्धन यादवचे सांघिक रौप्य. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chinki yadav secured olympic quota