चिराग - सात्विकची उपांत्य फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकिरेड्डी यांनी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील धडाका कायम ठेवताना चीनच्या जोडीस त्यांच्याच कोर्टवर दोन गेममध्ये हरवण्याचा पराक्रम केला. आता उपांत्य फेरीत या जोडीसमोर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोडीचे आव्हान असेल.

मुंबई : चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकिरेड्डी यांनी चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील धडाका कायम ठेवताना चीनच्या जोडीस त्यांच्याच कोर्टवर दोन गेममध्ये हरवण्याचा पराक्रम केला. आता उपांत्य फेरीत या जोडीसमोर जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या जोडीचे आव्हान असेल.

फुझोऊ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत चिराग-सात्विकने लि जुनहुई-लिउ युचेन यांचा 21-19, 21-15 असा 43 मिनिटांत पाडाव केला. आता त्यांची लढत जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मार्कस्‌ फर्नाल्डी गिडॉन आणि केविन संजया सुकामुजल्जो या इंडोनेशियाच्या जोडीविरुद्ध होईल.

पहिल्या गेमपासून भारतीय क्वचितच चुका केल्या. त्यांनी प्रत्येक गुणासाठी कडवी चुरस होत असताना मोक्‍याच्या वेळी आघाडी राखली. दुसऱ्या गेममध्ये 15-15 बरोबरीनंतर भारतीय जोडीने गीअर बदलले. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीस चुका करण्यास भाग पाडले. त्याचा फायदा घेत सलग सहा गुण जिंकत दुसरा गेम तसेच लढत जिंकली. गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनमध्ये उपविजेतेपद जिंकलेल्या चिराग-सात्विक जोडीवरच भारताच्या आता आशा आहेत.

चिराग - सात्विकने लि आणि लिउ या माजी जागतिक विजेत्या जोडीविरुद्ध राखलेले वर्चस्व स्थानिकांसाठी धक्कादायक होते. दोघांतील यंदाच्या यापूर्वीच्या दोन लढतीत प्रत्येकाने एकेक जिंकली होती, पण थायलंड ओपनमध्ये भारतीय जोडीस विजयासाठी तीन गेमचा संघर्ष करावा लागला होता. पहिल्या गेममध्ये 8-8 बरोबरीनंतर 16-16 बरोबरी होईपर्यंत भारतीयांकडे आघाडी होती. 18-18 बरोबरीनंतर भारतीयांनी आघाडी दवडली नाही. दुसऱ्या गेममध्ये चीन जोडीने कधीही आघाडी घेतली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chirag satwik enters in semi final