टाटा ओपन एटीपी सदैव पुण्यातच होईल : मुख्यमंत्री

मंगळवार, 1 जानेवारी 2019

टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पुणे : टाटा ओपन महाराष्ट्र एटीपी टेनिस स्पर्धा सदैव पुण्यातच होईल. या स्पर्धेमुळे नवोदितांना प्रेरणा मिळेल. ऍकॅडमीच्या माध्यमातून भविष्यात विजेते निर्माण होतील, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

म्हाळुंगे-बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सोमवारी सायंकाळी स्पर्धेचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी इतक्‍या महत्त्वाची स्पर्धा पुण्यात होणे राज्याचा आणि देशाचा लौकिक उंचावणारे असल्याचे नमूद करून ते म्हणाले की, 15 देशांच्या खेळाडूंचा सहभाग, त्यात चॅम्पियन असणे भूषण आहे. ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल.

यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, संयोजन समितीचे अध्यक्ष व "सकाळ माध्यम समूहा'चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, आमदार लक्ष्मण जगताप, संजय ऊर्फ बाळा भेगडे, भीमराव तापकीर, अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे, पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हार्डीकर, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, एमएमआरडीएचे सहआयुक्त संजय खंदारे, एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांचे स्वीय सचिव प्रवीण दराडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, या स्पर्धेच्या निमित्ताने राज्यात टेनिसचा प्रसार आणि प्रचार करण्याचे व्यापक प्रयत्न सुरू आहेत. ऍकॅडमीच्या शाखा राज्याच्या विविध गावांत सुरू होत आहेत. त्यातून राष्ट्रीय पातळीवरील विजेते निर्माण होत आहेत.

ताप असूनही कॅरोलीनाची उपस्थिती
प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील पुणे एसेस संघाची रिओ ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती जगज्जेती कॅरोलीना मरिन व संघाची संयुक्त मालकी असलेली बॉलीवूड तारका तापसी पन्नू मिश्र दुहेरीचा प्रदर्शनी सामना खेळण्याचे उद्‌घाटन सोहळ्याचे नियोजन होते, मात्र कॅरोलीनाला ताप आल्यामुळे भाग घेऊ शकली नाही. सामन्यानंतर मात्र कोर्टवर येऊन तिने चारही बाजूंच्या स्टॅंडमध्ये रॅकेटने टेनिस बॉल मारले. त्याद्वारे तिने टेनिसवरील प्रेम व्यक्त केले. तापसीने कोरियाच्या हिऑन चुंगशी जोडी जमविली. त्यांचा लिअँडर पेस व डेन्मार्कचा बॅडमिंटपटू मॅथीयस बो यांच्याशी सामना झाला. तापसीसाठी लिअँडरने हळूवार सर्व्हिस केली. तापसीचे काही शॉट पलीकडे बरोबर गेले, तर काही अलीकडे पडून नेटला लागले. त्यानंतरही तिने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत सामन्यात रंग भरले. समालोचक व डेव्हिस करंडक संघाचे माजी कर्णधार विजय अमृतराज यांनी तापसीला टिप्स दिल्या. चुंगनेही तिला शक्‍य तेवढे शॉट मारण्याची संधी दिली. दुसरीकडे मॅथीयसने पेसला पूरक खेळ केला. त्यामुळे हा छोटेखानी मुकाबला संस्मरणीय ठरला.

मुख्यमंत्र्यांचा सहभाग दिलसे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीआयपी कक्षात बसून प्रदर्शनी सामन्याचा आनंद लुटला. त्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांचे कोर्टवर आगमन झाले. सुरुवातीला त्यांनी बॉल बॉईज व बॉल गर्ल्स यांच्याशी हस्तांदोलन केले. त्यातील काही जणांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. त्यानंतर ते संयोजन समितीचे सदस्य व एटीपी पदाधिकाऱ्यांना भेटले. त्यानंतर उद्‌घाटनाचा कार्यक्रम सुरू झाला. 

...मुख्यमंत्र्यांनी कॅचही घेतला
कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी हातात रॅकेट घेऊन कोर्टच्या तीन बाजूंना सफाईदार अन्‌ उत्तुंग शॉट मारले. चौथ्या बाजूला त्यांनी मारलेला चेंडू स्टेडियमच्या छपराला लागून कोर्टवर पडला. स्वयंसेवकाने तो चेंडू मिळविला. तो पुन्हा आपल्याकडे टाकावा असे खुणावत मुख्यमंत्र्यांनी हात वर केला आणि एका हातात तो अचूकपणे टिपला तेव्हा सर्वांनीच दाद दिली.

सलामीच्या दिवशी लोकल बॉय अर्जुन स्टार
पुण्याच्या अर्जुन कढेने एन. श्रीराम बालाजी याच्या साथीत दुहेरीच्या पहिल्या फेरीत द्वितीय मानांकित जोडीला हरवून सनसनाटी निकाल नोंदविला. त्यांनी फिलीप ओस्वाल्ड-टिम प्युएट्‌झ यांच्यावर 7-6 (7-1), 4-6, 10-8 अशी मात केली. पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंत हेच दोघे जिंकले. त्यांनी वाईल्ड कार्डच्या संधीचा फायदा उठविला. इतर तीन भारतीय पराभूत झाले. जीवन नेदून्चेझीयन व अमेरिकेचा निकोलस मॉन्रो यांना चौथ्या मानांकित गेरार्ड-मार्सेल ग्रॅनोलर्स यांनी 6-4, 6-4, पूरव राजा-रामकुमार रामनाथन यांना ल्युक बॅम्ब्रीज-जॉनी ओमारा यांनी 7-6 (7-4), 6-3 असे हरविले. 

प्रज्ञेशची सुरुवात खराब झाली. पहिल्याच गेममध्ये त्याच्या सर्व्हिसवर गंडांतर आले. सहाव्या गेममधील ब्रेकसह त्याने भरपाई केली. त्यामुळे 3-3 अशी बरोबरी झाली. ती 5-5 अशी कायम राहिली. अकराव्या गेममध्ये प्रज्ञेशवर सर्व्हिस राखण्याचे दडपण होते. त्याचवेळी मोहने ब्रेक नोंदविला. मग सर्व्हिस राखत मोहने पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मोहने तिसऱ्या गेममध्ये ब्रेक संपादन केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cm fadanvis inaugurates tata open tennis tournament