मरना है, लेकिन करना है 

मुकुंद पोतदार
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

पुणे - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत जिवाच्या कराराने सहभागी होत सोनेरी यश मिळविलेल्या राहुल आवारेला प्रशिक्षक काका पवार यांचे "मरना है, लेकिन करना है' हे वाक्‍य सतत आठवत होते. त्यामुळे त्याने पाठोपाठ लढती जिंकण्याचा धडाका लावला. उजव्या खांद्याची दुखापत आणि ऑलिंपिकच्यावेळी वादग्रस्त निवड चाचणीमुळे डिवचल्या गेलेल्या राहुलने या स्पर्धेत पदार्पणात सुवर्णपदक जिंकून टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. 

राष्ट्रीय, आशियाई अशा स्पर्धांत पदक जिंकणारा राहुल अशा मोठ्या स्पर्धांत अपेक्षापूर्ती करू शकत नाही, असे महासंघाच्या निवड समितीने म्हटले होते. त्याने काका पवार यांच्या जांभूळवाडी येथील तालमीत कसून सराव केला. राहुलला 2010मध्ये दिल्ली व त्यानंतर ग्लासगोमध्ये संधीच मिळाली नव्हती. या स्पर्धेसाठी निवड झाल्यापासून त्याने "मिशन' सुरू केले. पाकिस्तानी मल्लास हरविल्यानंतर त्याला हात देऊन उठण्यास मदत करणारा राहुल संयमानेच खेळला. सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिरंगा झळकाविताना त्याला दिवंगत हरिश्‍चंद्र बिराजदार यांची आठवण आली आणि तो भावविवश झाला. "रुस्तुम-ए-हिंद' किताब मिळविलेले बिराजदार "वस्ताद' म्हणून नव्हे तर "मामा' म्हणून लोकप्रिय होते. राहुलने हे सुवर्णपदक त्यांनाच अर्पण करीत असल्याचे तालमीतील सहकारी मल्ल ज्ञानेश्‍वर गोचडे यांना कळविले. 

जेएसडब्ल्यूचा पाठिंबा  
राहुलला खांद्याच्या दुखापतीमधून सावरण्यासाठी "जेएसडब्ल्यू स्पोर्टस'चा पाठिंबा मिळाला. मुंबईत डॉ. दिनशॉ पारडीवाला यांनी त्याच्या उजव्या खांद्यावर उपचार केले. या दुखापतीमुळेच राहुलच्या कारकिर्दीत बरेच अडथळे आले होते. या वेळी शरीराने आणि मनाने सुसज्ज होत गोल्ड कोस्टमध्ये त्याने सोनेरी यशाला गवसणी घातली. 

Web Title: Commonwealth Games 2018 Wrestler Rahul Aware kaka pawar