आता 'लक्ष्य' ऑलिंपिक पदकांचे!

आता 'लक्ष्य' ऑलिंपिक पदकांचे!

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी देदीप्यमान कामगिरी नोंदविली असून, २०२० च्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने जोरदार पूर्वतयारी केली आहे. येत्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे भारताच्या पूर्वेला, म्हणजे टोकियो येथे होणार आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेच्या अनुभवाचा फायदा ऑलिंपिकमध्ये अधिकाधिक पदकांचे ‘लक्ष्य’ गाठण्यासाठी होणार आहे...
- दीपाली देशपांडे, ऑलिंपियन नेमबाज व भारतीय कुमार नेमबाजी संघाच्या मुख्य मार्गदर्शक 


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजांचे यश नवीन नसले, तरी अपेक्षित यश हे सुखावणारेच असते. भारतीय नेमबाजीचा दर्जा लक्षात घेता राष्ट्रकुल स्पर्धेतील यश हे सहजसाध्य वाटते. मात्र, याचमुळे नेमबाजांवर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अपेक्षांचे प्रचंड ओझे असते. भारतीय नेमबाजांनी त्यांचा सहभाग असलेल्या प्रत्येक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकावे व दोघे नेमबाज असल्यास सुवर्ण व रौप्यपदकही भारताचे असावे, अशीच अपेक्षा ठेवली जाते. त्यामुळे नेमबाजीतील कांस्यपदकही प्रसंगी अपयश मानले जाते! केवळ नेमबाजच नव्हे, तर हे दडपण भारतीय बॅडमिंटनपटूही या वेळी अनुभवत आहेत. हे म्हणजे सुवर्णपदक जिंकल्यास ‘ते जिंकायलाच हवे होते,’ आणि गमावल्यास टीकेचा सूर, अशी परिस्थिती दिसते. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा एकूण दर्जा कमी असला, तरी येथे पदक जिंकण्यासाठी नेमबाजांना आपल्या कामगिरीचा सर्वोत्तम दर्जा राखावा लागतो आणि एवढ्या दबावाखाली तो दर्जा राखणे खूपच आव्हानात्मक आहे.

दडपणात कामगिरी महत्त्वाची
नेमबाजीच्या स्वतंत्र स्पर्धांमधील दडपणापेक्षा राष्ट्रकुल, आशियाई आणि ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमधील दडपण मोठे असते आणि त्याचे परिमाण आणि परिणामही वेगळेच असतात. विश्‍वकरंडक, जागतिक नेमबाजीपेक्षा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये स्पर्धा कमी असली, तरी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये खेळाडूवर असलेल्या दडपणामुळे ती जास्त आव्हानात्मक होते. यामुळेच राष्ट्रकुल स्पर्धा ऑलिंपिक स्पर्धांच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर भारतीय नेमबाजांची ‘गोल्ड कोस्ट’ येथील कामगिरी खूपच आशादायी आहे. रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील अपयशानंतर या कामगिरीचे विश्‍लेषण फक्त पदक तक्‍त्यापुरते मर्यादित राहू शकत नाही. यासाठी प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीचे तांत्रिक विश्‍लेषण आवश्‍यक आहे. 

अंजुम मौदगिलची कामगिरी बघितल्यावर मी काय म्हणते आहे, हे लक्षात येईल. राष्ट्रकुल स्पर्धेत ती दोन प्रकारांत सहभागी झाली होती. तिची तयारीही उत्तम होती, परंतु पहिल्याच पन्नास मीटर प्रोन प्रकारांत काही क्षुल्लक तांत्रिक चुकांमुळे तिची कामगिरी खूपच खराब झाली. सुवर्णपदकावर हक्क सांगणाऱ्या खेळाडूला शेवटून पाचवा क्रमांक स्वीकारणे अपमानास्पद आणि क्‍लेशकारक होते. त्याच्या पुढच्याच दिवशी तिची थ्री पोझिशनची मॅच होती. त्यात तिने गेल्याच महिन्यात झालेल्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. मात्र या कामगिरीची पुनरावृत्ती सोपी नव्हती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या विचित्र वेळापत्रकामुळे तिला स्पर्धेपूर्वी सर्वसाधारणपणे मिळणारा सरावही मिळाला नव्हता. या परिस्थितीतून ती स्वतःला कशी सावरते, हे मला पाहायचे होते. पदकाचे दडपण होतेच, त्यात या स्पर्धेत पदक जिंकण्याची ही शेवटची संधी होती. तिने राष्ट्रकुलचा स्पर्धा विक्रम आठ गुणांनी मोडला. तिने स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत आपले अव्वल स्थान सोडले नाही. संकटकाळीच माणसाला आपली खरी ताकद कळते. या अनुभवातून तिचा आत्मविश्‍वास तर वाढलाच, पण ऑलिंपिकसारख्या स्पर्धेच्या वेळचे दडपण हाताळण्याची कुवत तिच्यात आहे हे तिला आणि मलाही कळले.   

नेमबाजीचा संघ समतोल
गोल्ड कोस्टमधील भारतीय नेमबाजी संघ पाहिल्यास लक्षात येईल, की या संघात अत्यंत अनुभवी खेळाडू, नव्या दमाचे खेळाडू आणि नवोदित युवा खेळाडूंचा सहभाग होता. जिथे गगन नारंग, अन्नूराज सिंग, हीना सिद्धू,, तेजस्विनी सावंत, संजीवसारखे मातब्बर खेळाडू होते, तेथेच रवी कुमार, दीपक कुमार, अंजुम मौदगिलसारखे नव्या दमाचे खेळाडूही होते. त्यांच्या जोडीला मेहुली घोष, अनीष भानवाला, मनू भाकरसारखे नवोदित खेळाडूही या संघात होते. या सर्व गटातील खेळाडू संघात आपले स्थान निश्‍चित करतात, तेव्हा त्या गटातील अनेक खेळाडू त्यांच्या मागोमाग तयार असतात. याचाच अर्थ भारतीय नेमबाजीमध्ये पहिल्यांदाच नेमबाजांची पहिली, दुसरी व तिसरी फळी जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी तयार आहे! खरे तर नेमबाजीच्या दृष्टीने विचार केल्यास नवोदित खेळाडूंची कामगिरी अनुभवी खेळाडूंच्या कामगिरीपेक्षा सरस आहे. यात अनुभवाची भर पडली की ती अजूनच उंचावेल. ही गोष्ट २०२०च्या टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या सगळ्याचे श्रेय भारतीय नेमबाजी संघटनेस जाते. संघटनेने २०१२नंतर आखलेले कार्यक्रम आणि त्याची काटेकोर व चोख अंमलबजावणीचे हे फलित आहे. अर्थातच क्रीडा मंत्रालय आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या सकारात्मक सहभागाशिवाय हे शक्‍य नाही.

ऑलिंपिकमध्ये भारतीयांना संधी 
दहा, पंधरा वर्षांपर्यंत अशी परिस्थिती होती की प्रत्येक स्पर्धेत चीनचे वेगवेगळे खेळाडू यायचे आणि जिंकून जायचे. आजच्या घडीला भारतीय नेमबाजीबद्दल हे घडत आहे. हे दोन वर्षांनी होणाऱ्या ऑलिंपिकसाठी नक्कीच सुचिन्ह आहे. त्यांनी अनुभवी नेमबाजांना दिलेले आव्हानही तितकेच महत्त्वाचे आहे. पण ही सुरवात आहे याचे भान नक्कीच बाळगायला हवे. हे युवा खेळाडू फार खोलात विचार करीत नाहीत. ते खेळाचा आनंद घेत असतात. ते मार्गदर्शकांनी शिकवलेले अमलात आणतात. उपजत गुणवत्तेमुळे हे यश मिळत असते. या परिस्थितीत आपण जे शिकलो ते पुरेसे आहे, असे नेमबाजांनी गृहीत धरल्यास त्यांची प्रगती खुंटते. त्यामुळे पदार्पणातच चांगली कामगिरी करणारे अनेक नेमबाज त्यानंतर अपेक्षित यश मिळवू शकत नाहीत. हेच घडू नये याची जबाबदारी मार्गदर्शकांबरोबर पालकांचीही आहे. अर्थात हीना सिद्धू, गगन नारंग, अभिनव बिंद्रांसारखे अपवादही आहेत. त्यांनी आपले पदार्पणातील यश अथक परिश्रमाने टिकवून ठेवले. प्रशिक्षक म्हणून आम्ही सर्वच युवा नेमबाजांना यशोमार्गावरील वाटचाल सुरू राहण्यासाठी काय करायला हवे, याची सतत जाणीव करून देत असतो. नवीन पिढीतील युवा खेळाडू जास्त समंजस आहेत. त्यांच्या यशाचा आलेख सतत उंचावत राहील, अशी अपेक्षा आहे.

भारतीय नेमबाजांची वाटचाल २०२० ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या दृष्टीने योग्य दिशेने सुरू आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धाही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेप्रमाणे भारताच्या पूर्वेला, म्हणजे टोकियो येथे होणार आहे. योगायोगाने सर्वच महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धा आपल्या पूर्वेकडील देशांत होत आहेत. तेथील अनुभव ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी निश्‍चितच महत्त्वपूर्ण आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत आपल्या यशाची पहाट झाली आहे. हा सूर्य असाच उत्तरोत्तर तळपत राहील, याची मला खात्री आहे. 

वेळेचे गणित पथ्यावर पडणार!
पूर्वेला असलेल्या देशांपेक्षा पश्‍चिमेला असलेल्या देशांच्या वेळेशी जुळवून घेणे कोणालाही अवघड जाते. कारण सोपे आहे, आपण आपली खाण्याची वेळ लांबवू शकतो, पण भूक लागण्यापूर्वी खाऊ शकत नाही. हेच झोपेबाबत आहे. जागरण करू शकतो, पण अगोदर झोपू शकत नाही. गोल्ड कोस्ट आणि टोकियोच्या प्रमाण वेळेत एका तासाचा फरक आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेच्या वेळी झालेली ही पूर्वतयारीही नक्कीच फायदेशीर ठरेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com