...‘टोकियो’ अभी दूर है...

...‘टोकियो’ अभी दूर है...

भारताने सध्या सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांत वेटलिफ्टिंग, नेमबाजी, कुस्ती या खेळांतील यशाच्या जोरावर पदक क्रमवारीत तिसरे स्थान पटकाविले आहे. या सर्व खेळांत राष्ट्रकुल स्पर्धेपेक्षा आशियायी क्रीडा स्पर्धेचा दर्जा खूपच वरचा आहे. जागतिक स्तरावर दबदबा असलेले चीन, कोरिया आणि जपान यांच्या अनुपस्थितीतील हे यश आहे. त्यामुळे अगदी जगाच्या पूर्वेला असलेल्या ऑस्ट्रेलियापासून पश्‍चिमेला असलेल्या कॅनडापर्यंतचे देश दिसत असले, तरी त्यांची जागतिक स्तरावरील खेळातील ताकद पाहिल्यास बहुतेक खेळांतील यश एखाद्या लुटुपुटुच्या लढाईतील आहे, असेच म्हणावे लागेल. 

या स्पर्धेकडे अर्थातच पूर्ण दुर्लक्ष करता येत नाही. टेबल टेनिसमध्ये भारताने सिंगापूरची हुकूमत मोडून काढत सुवर्णपदक जिंकले. बॅडमिंटनमध्ये भारताने प्रथमच मिश्र सांघिक सुवर्णपदक जिंकले. सिंधू, साईना, श्रीकांत, कश्‍यप असले, तरी बॅडमिंटनच्या सांघिक सुवर्णपदकात दुहेरीतील यश महत्त्वाचे असते. भारत यात कमी समजला जातो. आता दुहेरीच्या जोड्यांनी सांघिक सुवर्णपदक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली, हे दुर्लक्षित करून चालणार नाही. आपले हॉकीमध्ये सुवर्णपदकाच्या शर्यतीतून बाद होणे अपयशच आहे. पुरुष हॉकीत आपण ऑस्ट्रेलियाला हरवण्याचे स्वप्न बाळगत होतो. ते घडले असते, तर या सुवर्णपदकास आशियायी क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकापेक्षा जास्त महत्त्व आले असते, पण ते घडलेले नाही. महिला हॉकीत ऑस्ट्रेलियास दिलेली झुंज जमेची आहे. आता पदक जिंकले, तरी मोलाची गोष्ट असेल. भारतीय युवा ॲथलिट्‌स उंचावलेली कामगिरी नक्कीच लक्षवेधक आहे. जागतिक स्तरावर वर्चस्व राखणाऱ्या केनियासह आफ्रिकन धावपटूंचा सहभाग असूनही भारतीय पदकानजीक आहेत.  

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही खरे तर विविध स्पर्धांच्या पंक्तीत मांडल्यास खूप वरच्या दर्जाची नाही. ऑलिंपिक, जागतिक, विश्‍वकरंडक, आशियायी क्रीडा स्पर्धा या खालाखोल राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आहेत, याचे भान बाळगायला हवे. आता पदकविजेत्यांचे कौतुक सोहळे होतील. त्यांच्यावर बक्षिसाचा वर्षाव होईल. पण त्याचवेळी या प्रत्येक सुवर्णपदक विजेत्यांसाठी ऑलिंपिकचे यश अजून खूप दूर आहे, याचे भान प्रत्येकाने बाळगायला हवे. या स्पर्धेत काय मिळविले यापेक्षा काय गमावले, काय चुकले याचा विचार केल्यास आव्हान देण्याइतपत प्रगती नक्कीच होऊ शकेल. 

राष्ट्रकुल क्रीडा टेबल टेनिस स्पर्धेतील भारताचे यश नक्कीच सुवर्ण मोलाचे आहे. भारतीय टेबल टेनिसपटूंचे जागतिक क्रमवारीतील स्थान उंचावत असल्याचे या यशातून दिसले. चीन, जपान, कोरिया या स्पर्धेत नसले, तरी या स्पर्धेवर हुकूमत राखणाऱ्या सिंगापूरला आपण धक्का दिला आहे. त्याचबरोबर जागतिक स्तरावर नायजेरिया, इंग्लंड, कॅनडा हेही लक्षणीय यश मिळवत असतात. त्यांना मागे सारत आपण सांघिक स्पर्धेत बाजी मारली आहे. चीन, जपान, कोरिया असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे आव्हान खूपच खडतर असेल, पण भारतीय टेबल टेनिसची प्रगती योग्य दिशेने सुरू असल्याचे स्पर्धेत दिसले. 
- कमलेश मेहता,  भारतीय टेबल टेनिस संघाचे माजी राष्ट्रीय मार्गदर्शक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कुस्तीच्या यशाचा विचार करताना आपण त्या स्पर्धेत आपल्यासमोर कॅनडा आणि नायजेरिया यांचेच आव्हान असते, हे लक्षात घ्यायला हवे. भारतासह हे तीन देश आणि स्पर्धेतील अन्य देश यात खूपच तफावत आहे. त्याचवेळी आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्याला इराण, चीन, जपान, कोरिया, कझाकिस्तान, मंगोलिया यांसारख्या देशांबरोबर स्पर्धा करावी लागते. त्यामुळे स्पर्धा जास्त खडतर होते. आता या स्पर्धेत मौसम खत्री, पूजा धांदा यांचे हुकलेले सुवर्णपदक नक्कीच सलणारे आहे. 
- गिरिधर नायर, आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक 

भारताने चार वर्षांपूर्वीच्या स्पर्धेपेक्षा पदके कमी जिंकल्याचे दिसत असले, तरी सुवर्णपदकामध्ये नक्कीच वाढ झाली आहे. मीराबाई चानूने राखलेली हुकूमत यात सुखावणारी आहे. त्याचबरोबर या वेळी भारताचा एकही वेटलिफ्टर उत्तेजक चाचणीत दोषी आढळलेला नाही. आपल्या यशाला कोणताही डाग लागलेला नाही, हेही मोलाचे आहे. आम्हालाही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा स्टेपिंग स्टोन असल्याची जाणीव आहे. त्यामुळे आता लगेचच आशियाई क्रीडा स्पर्धेच्या शिबिरास सुरवात होत आहे.  
- चंद्रहास राय, वेटलिफ्टिंग तांत्रिक पदाधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com