लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश होणार नसल्याचे राष्ट्रकुल क्रीडा महासंघ प्रमुख लुईस मार्टिन यांनी सांगितल्यावर काही तासांतच ब्रिटिश सरकारने भारताचा सहभाग निश्चित करण्यासाठी पावले उचलली आहेत. राष्ट्रकुल स्पर्धेपूर्वी राष्ट्रकुल नेमबाजी घेण्याचा प्रस्ताव आता समोर येत आहे.
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश नसल्यामुळे या स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा विचार भारतीय ऑलिंपिक संघटना करीत आहे. आता लुईस मार्टिन यांच्या भूमिकेनंतर भारत आक्रमक होण्यापूर्वी ब्रिटनचे क्रीडामंत्री निगेल ऍडम्स सरसावले आहेत. त्यांनी 2022 ची राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा ब्रिटनमध्ये घेण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे वृत्त आहे. मात्र ही स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा भाग नसेल. या प्रस्तावानुसार पिस्तूल आणि शॉटगन स्पर्धा बर्मिंगहॅमला; तर रायफल स्पर्धा बिस्ली येथे होतील.
राष्ट्रकुलात नेमबाजी लोकप्रिय आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा सहभाग आम्हाला हवा आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत नेमबाजीचा समावेश होऊ शकतो का, राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धा होऊ शकते का, अशी विचारणा करणारे पत्र लिहिले आहे, असे ऍडम्स यांनी सांगितले. त्याचबरोबर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा महत्त्वाची आहे. राष्ट्रकुल क्रीडा महासंघ संबंधितांबरोबर चर्चा करीत आहे आणि सर्वमान्य तोडगा नक्की निघेल असा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील महिला ट्वेंटी-20 लढती एजबस्टन क्रिकेट मैदानावर होणार आहेत. या मैदानावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनिमित्त खास कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या वेळी ऍडम्स यांनी नेमबाजीचा अजूनही समावेश होऊ शकतो, याचे संकेत दिले.
राष्ट्रकुलातील भारत हा महत्त्वाचा सदस्य आहे. भारताचा सहभाग आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. बर्मिंगहॅममध्ये अनेक भारतीय आहेत. त्यांनाही आपल्या खेळाडूंचे यश साजरे करणे आवडेल.
- डेव्हिड ग्रेवेमबर्ग, राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे सीईओ
|