रिओनंतर ‘लक्ष्य’ला मिळतोय लक्षवेधी पाठिंबा - विशाल चोरडिया

रविवार, 27 नोव्हेंबर 2016

‘लक्ष्य’ संस्थेतर्फे गुणवान व सक्षम खेळाडूंना आवश्‍यक त्या सुविधांच्या रूपाने ‘३६० डिग्री सपोर्ट’ पुरविला जातो. रिओ ऑलिंपिकनंतर संस्थेची वाटचाल कशी सुरू आहे, याविषयी ‘लक्ष्य’चे संस्थापक आणि अध्यक्ष विशाल चोरडिया यांच्याशी साधलेला संवाद.

स्कूलिंपिक्‍ससारख्या उपक्रमाला पाठिंबा देण्यामागे आपली काय भूमिका आहे?
स्कूलिंपिक्‍सचे दुसऱ्यांदा आयोजन केल्याबद्दल ‘सकाळ माध्यम समूहा’चे सर्वप्रथम अभिनंदन करायला हवे. शालेय विद्यार्थ्यांसाठी असे मोठे व्यासपीठ निर्माण करणे हे ‘सकाळ’चे एक मोठेच कार्य असून, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे प्रतिभासंपन्न खेळाडू हेरण्यासाठी चालना मिळेल. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्यांची ओळख शाळेला नव्याने होईल. ही संकल्पना म्हणजे कुठेतरी ‘लक्ष्य’चीच भूमिका असल्यासारखे वाटते. याचे कारण तळागाळातील खेळाडूंना हेरून ‘३६० डिग्री सपोर्ट’ देण्याचे आमचे धोरण आहे. त्यामुळेच अशा उपक्रमाविषयी राकेश मल्होत्रा यांनी संपर्क साधताच आम्ही पाठिंबा दिला. भविष्यातही आमचा भरीव पाठिंबा सक्रिय सहभागाच्या रूपाने कायम असेल. याहीपुढे जाऊन स्कूलिंपिकमधील विजेत्यांसाठी काही वेगळा उपक्रम चालविता येईल का, याविषयी आम्ही ‘सकाळ’शी चर्चा करू.
रिओ ऑलिंपिकमध्ये जी दोन पदके मिळाली ती अनपेक्षित होती; पण काही अनुभवी क्रीडापटूंच्या अपयशामुळे एकूणच अपेक्षाभंगाचे वातावरण होते. अशावेळी ऑलिंपियन घडविण्याच्या ‘लक्ष्य’सारख्या संस्थेसमोर काय आव्हाने आहेत?
यापूर्वीची ऑलिंपिक आणि रिओमध्ये मोठा फरक आहे. यापूर्वी निघणारा नकारात्मक सूर या वेळी कमी होता, इतकेच नव्हे तर आधीच्या ऑलिंपिकच्या तुलनेत या वेळी पदके कमी मिळूनही भारतीयांनी झुंजार कामगिरी करणाऱ्यांना एकजुटीने उत्स्फूर्त प्रोत्साहन दिले. बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, महिला कुस्तीगीर साक्षी मलिक, जिम्नॅस्ट दीपा मलिक, रोइंगपटू दत्तू भोकनाळ यांना मिळालेला पाठिंबा प्रोत्साहन देणारा आहे. अशा खेळाडूंमुळे भारतीयांमध्ये जागरूकता निर्माण झाली. आता यातून क्रीडा संस्कृती आणि पर्यायाने ऑलिंपिक संस्कृती निर्माण करण्यासाठी सर्वच ‘स्टेकहोल्डर्स’ना एकत्र यावे लागेल. मला आनंद याचा वाटतो, की २००९ पासून जो उद्देश डोळ्यांसमोर ठेवून आम्ही ‘लक्ष्य’ला सुरवात केली, जी भूमिका घेतली, जे काही प्रयत्न केले त्यास एकप्रकारे पावतीच मिळाली आहे. यासाठी सानिया मिर्झाच्या साथीत खेळलेली टेनिसपटू प्रार्थना ठोंबरे हिचे उदाहरण आदर्श असून ते देता येईल. उदयोन्मुख खेळाडूंना कारकिर्दीच्या प्रारंभी पाठिंबा दिल्यास आपल्याला विशी-पंचविशीतील पदकविजेते ऑलिंपियन घडविता येतील हे सिंधू-साक्षीनेही दाखवून दिले आहे. त्यामुळे आम्हाला आणखी प्रयत्न करण्यासाठी मोठेच बळ लाभले आहे.

ऑलिंपिकमुळे एक वातावरणनिर्मिती झाली हे खरेच आहे; पण सध्याच्या मंदीच्या काळात प्रत्यक्ष मदत मिळायला याचा किती फायदा होत आहे?
ऑलिंपिकनंतर आम्ही आणखी योजनाबद्ध प्रयत्न सुरू केले आहेत. आम्ही संभाव्य प्रायोजकांशी चर्चा करीत आहोत. अनेक ठिकाणी आमचे प्रतिनिधी सादरीकरण करीत आहेत. मी स्वतः अनेक पातळ्यांवर आणखी सक्रिय झालो आहे. मला सांगायला आनंद वाटतो, की मर्सिडीज बेंझ, एल अँड टी, सोनी इंटरनॅशनल अशा कॉर्पोरेट कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. ‘लक्ष्य’ची पारदर्शक कार्यपद्धती, गुणवत्ता हेरण्याचा योजनाबद्ध उपक्रम, गुणी खेळाडूंना ‘३६० डिग्री सपोर्ट’ अशा कामाचे कौतुक होत आहे. यामुळे याशिवाय अनेक कंपन्या ‘लक्ष्य’बरोबर भागीदारी करण्यास उत्सुक आहेत. आमची चर्चा सुरू असून, लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. आम्ही आणखी चांगले आणि मोठे काम करू शकू, असा विश्‍वास या पाठिंब्यामुळे वाटतो.

तुम्हाला यापूर्वी मदत करीत असलेल्या प्रायोजकांचा प्रतिसाद कसा आहे? ‘लक्ष्य’साठी केलेल्या गुंतवणुकीकडे ते कोणत्या दृष्टिकोनातून पाहतात?
ऑलिंपिक झाल्यानंतर कल्याणी ग्रुपच्या अमित कल्याणी यांनी एक बैठक घेतली. त्या वेळी त्यांनी पाठिंबा दिलेले पाच-सहा खेळाडूसुद्धा उपस्थित होते. त्यांच्या कामगिरीचे अमित यांनी कौतुक केले. बाबा कल्याणी यांनीसुद्धा सकारात्मक पाठिंबा कायम ठेवण्याची ग्वाही दिली आहे. एक-दीड वर्षापूर्वी लुंकड रिॲल्टीज व कांतिलाल लुंकड फाउंडेशनच्या माध्यमातून अमित लुंकड यांनी कोल्हापूरची कुस्तीगीर रेश्‍मा माने हिला पाठिंबा दिला. तिने नुकतेच राष्ट्रकुल सुवर्ण मिळविले. अशा अनेक भागीदारांमध्ये एक समाधानाची भावना आहे.

नवे प्रायोजक मिळविण्यासाठी तुम्ही आणखी प्रयत्न करीत असल्याचे नमूद केले. या आघाडीवर कसा प्रतिसाद आहे?
मला सांगायला आनंद वाटतो, की रिओनंतर क्रीडा पाठिंब्यासाठी जागरूकता निर्माण होत आहे. ‘लक्ष्य’सारख्या कटिबद्ध आणि पारदर्शक संस्थेसह काम करण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली असून, त्यांचे प्राधान्य ‘लक्ष्य’ला आहे. सायबेज सॉफ्टवेअरमार्फत ‘सायबेज आशा’, ‘सायबेज खुशबू’ असे दोन उपक्रम चालविले जातात. त्यांनी मदतीची इच्छा व्यक्त केली आहे. फिनोलेक्‍स केबल्सचे प्रकाश छाब्रिया यांची पत्नी रितू ‘सीएसआर’ उपक्रम चालविते. याशिवाय एम. के. दिवाण ट्रेडमार्क फर्मनेही रस दाखविला आहे. ‘क्‍लीन सिटी मूव्हमेंट’ हाती घेतलेल्या आदर पूनावाला यांच्याशीही चर्चा करण्याचा मानस आहे. सामाजिक बांधिलकीची जाण असलेल्या आणि त्यासाठी सक्रिय योगदान देऊ इच्छिणारे असे अनेक उद्योगपती आम्हाला लाभत आहेत, हे नमूद करताना मला ‘लक्ष्य’चा अभिमान वाटतो.

खेळ हा व्यक्तीला, समाजाला खूप काही देतो असे म्हटले जाते. तुम्ही स्वतः टेनिसपटू आहात. ‘लक्ष्य’च्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रात काम करताना एक उद्योगपती म्हणून तुम्हाला काय मिळते?
अलीकडेच नूमविने वार्षिक क्रीडा दिनानिमित्त मला प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केले. ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेने दिलेले आमंत्रण एक मोठाच सन्मान आहे. सणस मैदानावर निमंत्रीत म्हणून आगमन झाल्यानंतर मला क्षणार्धात शाळेचे दिवस आठवले. आता परििस्थती किती बदलली आहे आणि यात मी खारीचा वाटा उचलत असल्याचा विचार मनाला सुखावून गेला.
प्रवीण मसालेवाले कंपनीचे काम करतानाच मी ‘लक्ष्य’साठीही सक्रिय असतो; पण या दोन आघाड्यांवर काम करण्याचे बळ मला औद्योगिक कौशल्यामुळे नव्हे तर खेळावरील प्रेमामुळे मिळते. अलीकडेच माझी महाराष्ट्र खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यामुळे मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी आणि प्रसंगी दिल्लीला मला जावे लागते. मी जेव्हा विविध खेळाडूंशी चर्चा करतो तेव्हा त्यांच्याकडून मिळणारी प्रेरणाच मला बळ देते. या खेळाडूंशी माझे कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे.

नजीकच्या कालावधीत ‘लक्ष्य’ कोणत्या उपक्रमांना प्राधान्य देणार आहे?
पॅरालिंपिक हीसुद्धा एक मोठी संधी आहे. त्यामुळे पॅरा खेळाडूंसाठी काही करण्याची गरज वाटते. शासकीय पातळीवरसुद्धा ‘२०२०’ उपक्रम आखण्यात आला आहे. राज्य सरकारने त्यासाठी स्थापन केलेल्या समितीत ‘लक्ष्य’चा सहभाग आहे. या समितीमधील स्थान मानाचे आहे.

Web Title: communicate with vishal chordia