'आयपीएल'पासून रोखण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा नवा फंडा 

वृत्तसंस्था
गुरुवार, 11 मे 2017

एकापेक्षा अधिक वर्षांसाठी करार करण्यात येणाऱ्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स यांचा समावेश करण्यात आला आहे.

सिडनी - देशासाठी खेळताना आपले प्रमुख खेळाडू तंदुरुस्त रहावेत आणि उपलब्ध व्हावेत, या हेतुने क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या खेळाडूंना "आयपीएल'पासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आपल्या खेळाडूंना एका ऐवजी अधिक वर्षांसाठी करारबद्ध करण्याचा गांभीर्याने विचार करत आहे. 

खेळाडूंना अधिक वर्षांसाठी करारबद्ध केले, तर ते "आयपीएल' खेळणार नाहीत असा प्रस्ताव क्रिकेट ऑस्ट्रेलिया टीम परफॉर्मन्स व्यवस्थापक पॅठ हॉवर्ड यांनीच क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर आणला आहे. 

क्रिकेटच्या एप्रिल आणि मे या ऑफ सिझनमध्ये आपले खेळाडू ताजेतवाने राहतील हा या मागील उद्देश आहे, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. मात्र, याच कालावधीत भारतात "आयपीएल' खेळविली जाते. हे निदर्शनास आणल्यावर आमचा हेतू साफ आहे. आम्ही असा कुठलाही विचार केलेला नाही, असे देखील क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केले आहे. 

एकापेक्षा अधिक वर्षांसाठी करार करण्यात येणाऱ्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, पॅट कमिन्स यांचा समावेश करण्यात आला आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा प्रस्ताव स्वीकारल्यास ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे मानधन वर्षाला दहा लाख डॉलरपेक्षा अधिक होणार आहे. त्याची कमाई त्या वेळी आयपीएलच्या बरोबरीने येईल. प्रत्यक्षात वॉर्नर स्मिथसारख्या क्रिकेटपटूंना आयपीएल फ्रॅंचाईजीकडून तीन वर्षांसाठी 10 लाख डॉलर इतके घसघशीत मानधन मिळणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया या संदर्भात थेट भाष्य करत नसले, तरी या प्रस्तावामुळे खेळाडूंना दुखापतीपासून दूर ठेवता येईल, असा त्यांना विश्‍वास आहे.

Web Title: Cricket Australia attempts to lure Steve Smith, David Warner away from IPL