Ishan Kishan : के. एल. राहुलऐवजी इशान भारतीय संघात; कसोटी अंतिम सामन्यासाठी बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ishan kishan as kl rahul replacement in team india world test championship final against australia bcci

Ishan Kishan : के. एल. राहुलऐवजी इशान भारतीय संघात; कसोटी अंतिम सामन्यासाठी बदल

मुंबई : आयपीएल लढतीदरम्यान दुखापतीला सामोरा गेलेला के.एल.राहुल जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याला मुकणार आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी भारतीय संघात यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय निवड समितीकडून सोमवारी ही घोषणा करण्यात आली.

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये ७ जूनपासून ओव्हल येथे जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीसाठी भारतीय संघात बदल करण्यात आला आहे. तसेच ॠतुराज गायकवाड, मुकेश कुमार व सूर्यकुमार यादव यांना पर्यायी खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे.

बंगळूर - लखनौ यांच्यामधील लढतीत राहुलच्या उजव्या पायाच्या मांडीला दुखापत झाली. आता त्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यानंतर बंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पुनवर्सन करण्यात येईल.

आयपीएल दरम्यान गोलंदाजीचा सराव करताना जयदेव उनाडकट याचा डावा खांदा दुखावला. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत त्याच्यावर उपचार सुरु आहेत. जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तो खेळेल की नाही याबाबतचा निर्णय थोड्या दिवसांनंतर घेण्यात येणार आहे.

बंगळूर - कोलकता यांच्यामधील लढतीदरम्यान वेगवान गोलंदाज उमेश यादवलाही दुखापत झाली. कोलकता संघाची मेडीकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. त्याच्या सहभागाबाबतही प्रश्‍नचिन्ह आहेत.

भारतीय संघ ः रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्‍वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एस.भारत (यष्टिरक्षक), रवीचंद्रन अश्‍विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टिरक्षक). राखीव खेळाडू - ॠतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.