लीमन प्रशिक्षकपद सोडणार

वृत्तसंस्था
शुक्रवार, 30 मार्च 2018

जोहान्सबर्ग - अवघे क्रिकेट विश्‍व हादरवून टाकणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात गुरुवारी आणखी एक बळी गेला. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लीमन यांनी चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यानंतर प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

जोहान्सबर्ग - अवघे क्रिकेट विश्‍व हादरवून टाकणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात गुरुवारी आणखी एक बळी गेला. ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लीमन यांनी चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यानंतर प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला.

या सगळ्या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लीमन यांना क्‍लीन चिट दिली असली, तरी सध्या प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर प्रचंड दडपण आहे. लीमन यांनी घेतलेल्या निर्णयावरून हेच समोर येते. चौथ्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत लीमन म्हणाले, ‘‘जीवन म्हणजे काय असते, हे येथे बसलेल्या प्रत्येकालाच माहीत आहे. अनेक अडथळे पार करून आपण पुढे जात असतो. या सगळ्या प्रकरणानंतर कुटुंबीयांशी चर्चा केल्यानंतर प्रशिक्षकपद सोडण्याची हीच योग्य वेळ असल्याचे ठाम मत झाले आणि निर्णय घेतला.’’

गेले काही दिवस प्रचंड दडपणाखाली गेले. हा निर्णय खेळाडूंना सांगणे खरंच खूप कठिण होते, असे सांगून लीमन म्हणाले, ‘‘काही खेळाडूंनी चूक केली. पण, त्याचे परिणाम खूप भयानक आहेत. त्याची किंमतही ते मोजत आहेत. या सगळ्या पार्श्‍वभूमीवर विचार करूनच निर्णय घेतला.’’

लीमन यांना क्‍लीन चिट दिली असली, तरी या सगळ्या प्रकरणानंतर दाखविण्यात येणाऱ्या किंवा व्हायरल झालेल्या व्हिडियोमध्ये लीमन सातत्याने मैदानावरील स्क्रिनकडे बघत असल्याचे दिसत होते. त्याचवेळी त्यांच्या शेजारी बसलेला राखीव खेळाडू पीटर हॅंडसकोम्ब याच्याकडील वॉकी टॉकीवरून बॅंक्रॉफ्टला ‘हे काय चालले आहे’ असे विचारण्याऐवजी ते यलो टेप पॅंटमध्ये लपव असे सांगत असल्याचे स्पष्ट होते. 

काही वेळाने हॅंड्‌सकोम्बच मैदानात त्यांचा संदेश घेऊन गेल्याचेही या व्हिडियोमध्ये दिसून येते. ‘क्‍लीन चिट’ मिळण्यापूर्वीदेखील त्यांनी प्रशिक्षकपद सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळेच आता अचानक त्यांनी प्रशिक्षकपद सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. 

Web Title: cricket Leeman quit the coach Johannesburg