Cricket news : IPLचा ताण नियंत्रणात ठेवावा लागेल ; रोहित शर्मा Cricket news IPL stress kept under control Rohit Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहित शर्मा

Cricket news : IPLचा ताण नियंत्रणात ठेवावा लागेल ; रोहित शर्मा

चेन्नई : जसप्रीत बुमरा, श्रेयस अय्यर या महत्त्वाच्या खेळाडूंना झालेल्या दुखापतींचा फटका भारतीय क्रिकेट संघाला बसत आहे. ऑस्ट्रेलियाकडून भारतावर एकदिवसीय मालिकेत पराभवाची नामुष्कीही ओढवली.

आगामी व्यग्र व महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय वेळापत्रकावर नजर टाकता आयपीएलमध्ये खेळून दुखापत ओढवून घेऊ नये यासाठी भारतीय संघ व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, ३१ मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलचा ताण नियंत्रणात ठेवावा लागणार आहे.

रोहित पुढे सांगतो, भारतीय संघातील महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. हे खेळाडू अंतिम अकरामध्ये असतात. त्यामुळे आम्हाला त्यांची उणीव नक्कीच भासते, पण प्रत्येक खेळाडू हा प्रौढ आहे. त्याचे शरीर कितपत साथ देत आहे, याची कल्पना त्यांना असेलच. जेव्हा परिस्थिती आवाक्याबाहेर जातेय असे वाटत असतानाच त्यांनी एखाद्‍ दुसऱ्या लढतीमधून माघार घ्यायला हवी. असे करण्याची गरज पडेल असे वाटत नाही, असे रोहित पुढे नमूद करतो.

संघमालकांवर अवलंबून

या वर्षी जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. तसेच मायदेशात एकदिवसीय विश्‍वकरंडकाचे आयोजनही करण्यात येणार आहे. याकडे लक्ष देता भारतीय संघ व्यवस्थापनाने आयपीएलमधील सहभागी संघांच्या मालकांना याबाबत सूचित केले आहे. याबाबत रोहित म्हणाला, संघ मालकांनी खेळाडूंना खरेदी केले आहे. त्यामुळे आता त्यांच्यावरच सर्व काही अवलंबून असणार आहे. तसेच खेळाडूंनाही आपल्या तंदुरुस्तीकडे बघावे लागणार आहे, असे रोहित स्पष्ट म्हणतो.

सूर्याची पाठराखण

रोहित शर्माने तिसऱ्या लढतीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवची पाठराखण केली. सूर्यकुमारच्या अपयशाबद्दल तो म्हणाला, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सूर्यकुमार यादव तिन्ही वेळा शून्यावर बाद झाला, पण त्याला तीनच चेंडू खेळायला मिळाले. याकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता हे माहीत नाही, पण हे चेंडू प्रभावी होते, असे तो म्हणाला.

त्रुटींवर काम करणार

रोहित शर्माने आतापर्यंत केलेल्या कामगिरीबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, आम्ही आतापर्यंत नऊ एकदिवसीय सामने खेळलो. या सामन्यांमधून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेआधीपर्यंत आम्ही छान खेळ केला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या दोन लढतींत ज्या चुका झाल्या त्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. त्रुटींमध्ये सुधारणा आवश्‍यक आहेत, असे रोहित म्हणतो.