दहशतवादी पाकबरोबर क्रिकेट नाहीच: क्रीडामंत्री

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी दुबईमध्ये भेटून दोन देशांमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चाही करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर क्रीडामंत्र्यांनी बीसीसीआयला स्पष्ट इशारा दिला आहे

नवी दिल्ली - दहशतवाद व क्रिकेट एकत्र राहू शकत नसल्याचे स्पष्ट करत केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारत व पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामन्यांची मालिका होण्याची शक्‍यता फेटाळून लावली आहे.

इंग्लंडमध्ये होत असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेमध्ये भारत व पाकिस्तान यांच्यामध्ये येत्या चार जून रोजी एकदिवसीय सामना खेळविला जाणार आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी दुबईमध्ये भेटून दोन देशांमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चाही करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर क्रीडामंत्र्यांनी बीसीसीआयला स्पष्ट इशारा दिला आहे.

आयसीसीच्या भविष्यकालीन वेळापत्रकानुसार या वर्षाच्या अखेरीस भारत व पाकिस्तानमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र दोन देशांमधील तणावग्रस्त परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर ही मालिका रद्द होण्याची दाट शक्‍यता असून क्रीडामंत्र्यांनी दिलेला हा इशारा अत्यंत संवेदनशील मानला जात आहे.

Web Title: Cricket News:No cricket between India and Pakistan