रोनाल्डोचा रेयाल माद्रिदला निरोप? 

वृत्तसंस्था
सोमवार, 28 मे 2018

रेयाल माद्रिदचा चेहरा असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो; तसेच चॅंपियन्स लीगच्या अंतिम सामन्याचा हिरो गेराथ बेल हे रेयाल माद्रिद संघाचा निरोप घेण्याचा विचार करीत आहेत. रोनाल्डोने भविष्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले; तर सातत्याने बदली खेळाडू म्हणून खेळण्याचा कंटाळा आल्याचे सांगत बेलने रेयाल माद्रिद सोडण्याचे संकेत दिले.

किएव - रेयाल माद्रिदचा चेहरा असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो; तसेच चॅंपियन्स लीगच्या अंतिम सामन्याचा हिरो गेराथ बेल हे रेयाल माद्रिद संघाचा निरोप घेण्याचा विचार करीत आहेत. रोनाल्डोने भविष्याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगितले; तर सातत्याने बदली खेळाडू म्हणून खेळण्याचा कंटाळा आल्याचे सांगत बेलने रेयाल माद्रिद सोडण्याचे संकेत दिले. 

रोनाल्डो रेयाल माद्रिदचा निरोप घेणार असल्याची चर्चा खूप महिन्यांपासून सुरू आहे. या विषयावर रोनाल्डोने प्रथमच उत्तर दिले. आता विजेतेपदाचा आनंद घेणार आहे. मला सतत प्रोत्साहित करणाऱ्या चाहत्यांना काही दिवसांत नेमके काय, ते नक्की सांगणार आहे. रेयाल माद्रिदबरोबरचे दिवस खूपच सुखाचे होते, असे रोनाल्डोने सांगितले. याबाबत वारंवार विचारणा केल्यावर रेयाल माद्रिदच्या खेळाडूंच्या भविष्याची चर्चा आताच कशाला? माझ्या मनात कोणत्याही शंका नाहीत; पण आता हे महत्त्वाचे नाही. विश्रांतीनंतर पोर्तुगाल संघात दाखल होईल. काही आठवड्यांतच सर्व काही सांगणार आहे, असे त्याने सांगितले. 

रोनाल्डो रेयाल सोडण्याचा विचार करीत आहे का, या प्रश्‍नानेच मार्गदर्शक झिनेदीन झिदान यांना धक्का बसला. रोनाल्डोने रेयालकडेच राहावे, असेच माझे मत आहे, असे त्यांनी सांगितले. हीच अपेक्षा रेयालचा कर्णधार सर्जिओ रामोस याने व्यक्त केली; पण त्याचवेळी त्याने रोनाल्डोने आपल्या भविष्याबाबत संघ सहकाऱ्यांना कल्पना द्यावी, ही अपेक्षा व्यक्त केली. 

दरम्यान, गेराथ बेलही रेयालचा निरोप घेण्याचा विचार करीत आहे. गत चॅंपियन्स लीगच्या अंतिम लढतीतही बेलने राखीव खेळाडू म्हणून आल्यावर गोल केला होता. त्याला महत्त्वाच्या सामन्यात राखीव खेळाडू म्हणूनच मैदानात उतरवले जात आहे. अर्थात, दुखापतीमुळे तो अनेकदा लढतींना अपात्रही ठरला आहे. 

अंतिम संघात कोणाला घ्यावे, कोणाला कधी खेळवावे, हा निर्णय पूर्णपणे मार्गदर्शकांचा आहे. अर्थातच, सुरवातीपासून मैदानात नाही, याचा त्रास होतोच. भविष्याबाबत मी एजंटबरोबर लवकरच चर्चा करणार आहे. 
- गेराथ बेल 

 

Web Title: Cristiano ronaldo news