‘ते’ दहा सेकंद आयुष्यभर सलत राहतील - दत्तू भोकनळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

नागपूर - रिओ ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे, माझ्यासारख्या खेडेगावातून आलेल्या खेळाडूसाठी स्वप्नवत अनुभव होता. स्पर्धेत अवघ्या दहा सेकंदांनी पदक हुकले.  अगदी थोडक्‍यात पदक हुकल्याचे दु:ख आयुष्यभर सलत राहील, अशा शब्दात ऑलिंपियन दत्तू भोकनळ याने आपल्या भावना बोलून दाखविल्या. विश्‍व मधुमेहदिनाच्या पूर्वसंध्येवर आयोजित जनजागृती कार्यक्रमासाठी नागपुरात आला असता दत्तू प्रसारमाध्यमांशी बोलत होता. 

नागपूर - रिओ ऑलिंपिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणे, माझ्यासारख्या खेडेगावातून आलेल्या खेळाडूसाठी स्वप्नवत अनुभव होता. स्पर्धेत अवघ्या दहा सेकंदांनी पदक हुकले.  अगदी थोडक्‍यात पदक हुकल्याचे दु:ख आयुष्यभर सलत राहील, अशा शब्दात ऑलिंपियन दत्तू भोकनळ याने आपल्या भावना बोलून दाखविल्या. विश्‍व मधुमेहदिनाच्या पूर्वसंध्येवर आयोजित जनजागृती कार्यक्रमासाठी नागपुरात आला असता दत्तू प्रसारमाध्यमांशी बोलत होता. 

रोईंगसारख्या अनोळखी व दुर्लक्षित खेळाला नवी ओळख देणारा दत्तू म्हणाला, २०१२ मध्ये रोईंगला सुरुवात केल्यानंतर ऑलिंपिकमध्ये सहभागी होईल, याचा स्वप्नातही विचार केला  नव्हता. पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकाराच्या प्राथमिक फेरीत चांगली कामगिरी केल्यानंतर मला देशासाठी पदक जिंकण्याची संधी होती. दुर्दैवाने अंतिम क्षणी कमी पडलो. अवघ्या दहा सेकंदांनी माझे पदक हुकले. संधी असूनही पदक मिळविण्यात अपयशी ठरल्याचे दु:ख आजही मनात आहे. भविष्यातही पदकाची हुरहुर राहील.

रिओच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे सांगून दत्तू म्हणाला, अनेक देशांतील खेळाडू कित्येक वर्षांपासून ऑलिंपिकच्या तयारीला लागले होते. त्यांच्या तुलनेत मला फारच कमी अवधी मिळाला. सरावाला आणखी काही महिने मिळाले असते, तर कदाचित मी पोडियमवर उभा दिसलो असतो. रिओमधील अपयश चार वर्षांनी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकमध्ये भरून काढण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आगामी ऑलिंपिकची तयारी आतापासून करणार असल्याचे त्याने सांगितले. 
एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या दत्तूच्या वडिलांचा विहिरी खोदण्याचा व्यवसाय होता. वडिलांच्या अकाली निधनानंतर त्यानेही काही दिवस हा व्यवसाय केला. मात्र, दत्तूची मजबूत देहयष्टी व बांध्यामुळे तो २१ व्या वर्षीच सेनादलात भरती झाला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकल्यानंतर तो रिओसाठी पात्र ठरला होता. या प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारा तो एकमेव भारतीय होता.

रिओ ऑलिंपिकनंतर रोईंगकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालल्याचे सांगून, अनेक प्रतिभावान खेळाडू या खेळाकडे ऑलिंपिक पदकाच्या दृष्टीने पाहात असल्याचे दत्तूने सांगितले. केंद्र सरकारने ग्रामीण भागातील युवकांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे दत्तू म्हणाला. दत्तूने ऑलिंपिकपूर्वी केंद्र सरकार व सेनादलाकडून खूप चांगली मदत मिळाल्याचे सांगितले. दत्तूचा सरकारच्या ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम’ (टीओपी) या योजनेत समावेश होता. पत्रकार परिषदेला डॉ. सुनील गुप्ता, डॉ. कविता गुप्ता, डॉ. अजय अंबाडे व प्रवीण ठाकरे उपस्थित होते.

Web Title: dattu bhoknal talking