दत्तू जागतिकच नव्हे, ऑलिंपिकसाठीही अपात्र

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

दत्तू भोकनळ याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असला, तरी त्याच्यासाठी या महिन्याच्या अखेरीस होणारी जागतिक स्पर्धाच नव्हे, तर ऑलिंपिक सहभागही अशक्‍यच आहे.

मुंबई : दत्तू भोकनळ याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असला, तरी त्याच्यासाठी या महिन्याच्या अखेरीस होणारी जागतिक स्पर्धाच नव्हे, तर ऑलिंपिक सहभागही अशक्‍यच आहे. भारतीय रोईंग महासंघाने त्याच्यावर घातलेल्या बंदीमुळे तो कोणत्याही स्पर्धेत किमान दोन वर्षे नसेल.
मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यामुळे दत्तूचा जागतिक स्पर्धेतील सहभागाचा मार्ग मोकळा झाला, अशी चर्चा सुरू होती. प्रत्यक्षात त्याची जागतिक स्पर्धेसाठी भारतीय संघातही निवड कशी होईल, अशी विचारणा रोईंग क्षेत्रातील अभ्यासकांनी केली. दत्तूने गतवर्षी काही महिन्यात तीन महत्त्वाच्या चुका केल्या होत्या. त्याने शिस्तभंग केला होता. काही चुकीची माहितीही दिली होती. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय रोईंग संघटनेचे सचिव गिरीश फडणीस यांनी दत्तूवर दोन वर्षांची बंदी असल्याचे सांगितले. ते म्हणाले, या वर्षाच्या सुरुवातीस दत्तू भोकनळविरुद्ध राष्ट्रीय संघटनेने काही आरोप ठेवले. त्याबाबत त्यास नोटीस बजावण्यात आली. दत्तूने हे आरोप मान्य केले. त्यानुसार त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय महासंघाच्या कार्यकारिणीने एकमताने घेतला आहे. अर्थातच त्याची जागतिक स्पर्धेसाठी संघात निवड झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.
जागतिक स्पर्धा 25 ऑगस्टपासून ऑस्ट्रियात आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच अपेक्षित आहे. या स्पर्धेच्या निवडीसाठी झालेली राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा पुण्यात झाली होती. त्या स्पर्धेतील पदकविजेत्यांत दत्तूचा समावेश नाही.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dattu bhoknal will not be playing world championship