प्रदुनोवाला पर्याय शोधण्यासासाठी दीपा प्रयत्नशील

संजय घारपुरे
मंगळवार, 21 मार्च 2017

मुंबई - भारताची ऑलिंपियन जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि प्रदुनोवा यांचे नाते अतूट आहे. मात्र, दीपा आता मार्गदर्शक बिश्वेश्वर नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवा प्रकार करण्याचा विचार करीत आहे. आम्ही याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही; पण त्यादृष्टीने नक्कीच गांभीर्याने विचार करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

मुंबई - भारताची ऑलिंपियन जिमनॅस्ट दीपा कर्माकर आणि प्रदुनोवा यांचे नाते अतूट आहे. मात्र, दीपा आता मार्गदर्शक बिश्वेश्वर नंदी यांच्या मार्गदर्शनाखाली नवा प्रकार करण्याचा विचार करीत आहे. आम्ही याबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही; पण त्यादृष्टीने नक्कीच गांभीर्याने विचार करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.

जागतिक जिम्नॅस्टिक महासंघ प्रत्येक प्रकाराचे काठिण्य आता ठरवणार आहे. त्याचबरोबर दीपाचे लॅंडिंग (कौशल्य दाखवण्याची प्रक्रिया नीटपणे उभे राहून पूर्ण करणे) जर प्रुदुनोवामध्ये सुधारले, तर याच प्रकारातही कायम राहू; पण रिओमधील कामगिरीचा आढावा घेतल्यावर यात काय पर्याय आहेत, याचा अंदाज घेण्यास सुरवात केली आहे. प्रुदुनोवाचे काठिण्य ७ वरून ६.४ पर्यंत कमी होत आहे. त्यामुळे यातील माफक चुकीचा जास्त फटका बसेल. त्यामुळेच आता दीपा जास्त सफाईने करता येऊ शकणारा आणि कमी कठीण असणारा पर्याय लक्षात घेऊन काम करत आहे. 

दीपा म्हणाली, ‘‘रिओ ऑलिंपिकनंतर पुरेशा ब्रेकनंतर आता टोकियो ऑलिंपिकच्या दृष्टीने सराव सुरू केला आहे. सरांबरोबर लक्ष्य साधण्याच्या दिशेने चर्चा करीत आहे. त्याचदृष्टीने आम्ही हॅंडस्प्रिंग रुडी प्रकाराचा विचार करीत आहोत. माझा सरांवर पूर्ण विश्‍वास आहे, त्यामुळे दीपा म्हणजे प्रुदुनोवा हे समीकरण झाले असले, तरी भविष्यात हे समीकरण बदललेले दिसू शकेल. यासाठी सर सर्वंकष विचार करून निर्णय घेतील. ते जे ठरवतील ते मला मान्य आहे.’’ दीपाचा प्रकार बदलण्यासाठी आपण दीपासह अनेक प्रशिक्षक आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच अंतिम निर्णय घेऊ, असे दीपाचे प्रशिक्षक नंदी यांनी सांगितले. 

दीपा म्हणते...
 जिम्नॅस्टिकमध्ये चांगले यश मिळू शकते हे माझ्या कामगिरीतून दाखवले, त्याचे जास्त समाधान
 मला लीजंडस्‌ म्हणू नका, मी स्टारही नाही
 परीक्षेतील चांगले मार्क नक्कीच सुखावतात
 काय नाही त्याचे दुःख करीत बसले तर प्रगती होणारच नाही
 मला क्रीडा प्राधिकरण तसेच सरकारचे चांगले साह्य लाभले, त्यामुळेच प्रगती
 भारतीय जिम्नॅस्टिकच्या प्रगतीसाठी राष्ट्रीय स्पर्धा सुरू होण्याची गरज
 सरावाचे वेळापत्रक सर्वांनीच काटेकोरपणे पाळण्याची गरज
 माझ्या ब्रेकफास्टची वेळ ८ आहे, ती मी ८.३० ही करीत नाही

नादियाला भेटण्यापूर्वी टेन्शन
जागतिक जिम्नॅस्टिकची सम्राज्ञी जात असलेल्या नादिया कॉमेन्सीला भेटण्याची संधी दीपाला मुंबईत लाभली. त्या भेटीपूर्वी खूप टेन्शन आले होते. काहीशी थरथरत होते. तिने माझी ऑलिंपिकमधील कामगिरी पाहिल्याचे ऐकल्यावर नक्कीच मी सुखावले. तिच्यासह बसून मुलाखत देणे हेच माझ्यासाठी मोलाचे होते. तिचे मत माझ्यासाठी नक्कीच मोलाचे आहे. त्यापासून नक्कीच प्रेरणा मिळाली आहे, असे दीपाने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Deepa karmakar indian Gymnast