तिरंदाज दीपिकाकडून चित्रपटाचा करार रद्द 

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

तिरंदाज दीपिकाकुमारीने ऑलिंपिक पूर्वतयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटात काम करण्याचा करार रद्द केला आहे. तिने "बिसाही' या चित्रपटात आपण काम करणार नसल्याचे आता सांगितले आहे. 

नवी दिल्ली - तिरंदाज दीपिकाकुमारीने ऑलिंपिक पूर्वतयारीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपटात काम करण्याचा करार रद्द केला आहे. तिने "बिसाही' या चित्रपटात आपण काम करणार नसल्याचे आता सांगितले आहे. 

दीपिकाकुमारी ही भारतीय तिरंदाजीचा चेहरा आहे. तिच्यावरील लेडीज फर्स्ट ही डॉक्‍युमेंटरी चांगलीच लोकप्रिय आहे. तिला निर्माते सुरेश सेठ भगत आणि दिग्दर्शक मनीष सिन्हा यांनी "बिसाही' या चित्रपटासाठी करारबद्ध केले होते. या चित्रपटात तिची प्रमुख भूमिका होती. चित्रपटाचा विषय चांगला होता. त्यामुळेच मी तयारी दर्शवली होती; पण चित्रपटात काम करण्याचे ठरवले, तर त्याचा सरावावर पर्यायाने स्पर्धेतील कामगिरीवर प्रतिकुल परिणाम होईल, याची मला जाणीव झाली, असे दीपिकाने सांगितल्याचे वृत्त आहे. 

आपण चित्रपटात काम करण्याबाबत करार केला, त्या वेळी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाबाबत पुरेशी कल्पना नव्हती; मात्र आता हा कार्यक्रम पाहिल्यावर चित्रपटाचे शूटिंग आणि सराव एकाच वेळी केल्यास त्याचा ताण पडेल. वर्ल्ड कप स्पर्धांबरोबरच आशियाई क्रीडा स्पर्धाही या वर्षी आहे. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे दीपिकाने सांगितले. 

निर्मात्यांनी मला 10 ते 11 दिवसच शूटिंगसाठी द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्याचबरोबर हे शूटिंग शनिवारी, रविवारी होईल, अशी ग्वाहीही दिली होती. या शूटिंगचा माझ्या सरावावर परिणाम होणार नाही, असेही त्यांचे मत होते; मात्र आठवड्यातील पाच दिवस कसून सराव केल्यावर दोन दिवस विश्रांती हवी असते. त्यामुळे मी या चित्रपटातून माघार घेतली आहे, असेही तिने सांगितले. 

Web Title: deepika kumri was canceled contracts