दिल्लीची बंगालवर दबंगगिरी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 ऑगस्ट 2016

नवी दिल्ली - घरच्या मैदानावर खेळण्याचे टॉनिक मिळालेल्या दिल्लीने लढण्यापूर्वीच शस्त्र म्यान केलेल्या बंगाल वॉरियर्सवर दबंगगिरी दाखवली आणि 41-20 अशा विजयासह प्रो-कबड्डी स्पर्धेतील अंधुक आशांना संजीवनी दिली; तर उपांत्य फेरीत अगोदरच स्थान मिळवलेल्या जयपूरचा 35-23 पराभव करून तेलगूनेही बाद फेरी निश्‍चित केली. 

नवी दिल्ली - घरच्या मैदानावर खेळण्याचे टॉनिक मिळालेल्या दिल्लीने लढण्यापूर्वीच शस्त्र म्यान केलेल्या बंगाल वॉरियर्सवर दबंगगिरी दाखवली आणि 41-20 अशा विजयासह प्रो-कबड्डी स्पर्धेतील अंधुक आशांना संजीवनी दिली; तर उपांत्य फेरीत अगोदरच स्थान मिळवलेल्या जयपूरचा 35-23 पराभव करून तेलगूनेही बाद फेरी निश्‍चित केली. 

स्पर्धेतील अखेरचा टप्पा आजपासून नवी दिल्लीत सुरू झाला. आजच्या सामन्यापूर्वी तळाच्या स्थानी असलेल्या दिल्लीला उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवण्यासाठी चारही सामने जिंकणे आवश्‍यक आहे. त्याप्रमाणे आज त्यांनी दणदणीत विजयासह सुरवात केली. आतापर्यंतच्या स्पर्धेत माफक कामगिरी करणाऱ्या काशिलिंग आडकेने कमालीची शानदार कामगिरी केली. त्याने 19 चढाया केल्या, त्यात तो एकदाच बाद झाला आणि चढायांचे 11 आणि बोनसचे दोन असे 13 गुण मिळवले. 

स्पर्धेच्या सुरवातीस मुंबईत (पुण्याचे होम ग्राउंड) झालेल्या टप्प्यात बंगालने दिल्लीवर सहज मात केली होती. त्या वेळी काशिलिंगची शिकार वारंवार होत होती. काशिलिंग भारत पेट्रोलियम संघातून व्यावसायिक स्पर्धेत खेळतो. त्यांचे प्रशिक्षक प्रताप शेट्टी हे बंगालचे प्रशिक्षक आहेत. काशिलिंग आमच्याविरुद्ध यशस्वी होणार नाही, असे मत त्यांनी मुंबईतील सामन्यानंतर मांडले होते. आज काशिलिंगनेच बंगालची शिकार केली. तीन दिवसांपूर्वी याच बंगालने यू मुम्बाचा पराभव करून त्यांना बॅकफूटवर टाकले होते. आज एकतर्फी पराभवानंतर बोलताना प्रताप शेट्टी म्हणाले, की आजचा सामना आम्ही औपचारिक म्हणून खेळलो.
 

दिल्लीने मात्र त्यांच्या औपचारिक धोरणाचा फायदा घेत तुफानी खेळ केला. प्रेक्षकांचा उदंड पाठिंबा मिळालेल्या दिल्लीने सुरवातीपासूनच पाचवा गिअर टाकला होता. काशिलिंग चढायांत गुण मिळवत होता; तर सेल्वामणीही चढायांमध्ये कमाल दाखवत होता. पकडींमध्ये सचिन शिंगाडे आणि सुरेश कुमारही तटबंदी भक्कम करून होते. विशेष म्हणजे प्रशांत चव्हाण यानेही कमालीच्या पकडी केल्या. एकूणच दिल्लीची प्रत्येक चाल यशस्वी होत होती. यू मुम्बाला मुंबईत पराभूत करण्यात जॅंक कून लीच्या चढाया मोलाच्या ठरल्या होत्या. आज तो अवघे पाच गुणच मिळवू शकला. मोनू गोयतने अष्टपैलू खेळ केल्यामुळे बंगालला 20 गुणांपर्यंत मजल मारता आली. तरीही तीन लोण स्वीकारण्याइतकी वाईट अवस्था बंगालची झाली.

तेलगूसमोर जयपूर निष्प्रभ
जसवीर सिंग आणि शब्बीर बापू यांना विश्रांती देणाऱ्या जयपूरला तेलगूने चारी मुंड्या चीत केले. दोन दिवसांपर्यंत जोशात खेळणाऱ्या जयपूरचा आजचा खेळ एकदमच कमकुवत होता. स्पर्धेतील पकडींमध्ये दुसऱ्या स्थानी असलेला अमीत हुडा; तसेच रण सिंग, राजेश नरवाल मैदानात असले तरी त्यांच्यावर दोन लोण स्वीकारण्याची वेळ आली. तेलगूचा हुकमी चढाईपटू राहुल चौधरीने पुन्हा एकदा मैदान गाजवले.

बंगालविरुद्धचा विजय सोपा असला तरी पुढील तीन दिवसांत आम्हाला पाटणा, पुणे आणि मुंबई यांचा सामना करायचा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्या त्या संघांप्रमाणे आम्ही डावपेच तयार करून खेळ करू.
-काशिलिंग आडके, दिल्लीचा खेळाडू

Web Title: Delhi Bengal on dabangagiri