आशियाई कबड्डीतूनही गेहलोतशाही संपुष्टात?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

मुंबई - भारतीय कबड्डी महासंघावरील गेहलोतशाही दिल्ली उच्च न्यायालयाने बरखास्त केल्यावर आता आशियाई कबड्डीतूनही गेहलोतशाही संपुष्टात येण्याची शक्‍यता दिसत आहे. 

मुंबई - भारतीय कबड्डी महासंघावरील गेहलोतशाही दिल्ली उच्च न्यायालयाने बरखास्त केल्यावर आता आशियाई कबड्डीतूनही गेहलोतशाही संपुष्टात येण्याची शक्‍यता दिसत आहे. 

आशियाई कबड्डी महासंघाच्या पुढील आठवड्यात जाकार्तामध्ये होणाऱ्या बैठकीत गेहलोत उपस्थित राहू शकणार नाहीत, त्यामुळे त्यांची या संघटनेतील मक्तेदारीही संपुष्टात येण्याची शक्‍यता आहे. आशिया कबड्डी महासंघाची २३ ऑगस्टला आशियाई क्रीडा स्पर्धेदरम्यान बैठक होणार असल्याची चर्चा आहे. या संदर्भातील सचिव मोहंमद सारवार यांनी निमंत्रणही पाठवले आहे, पण या पत्रावर कुठेही सध्याच्या अध्यक्षांचा उल्लेख नाही. हे पत्र ३० जुलैचे आहे. आशियाई ऑलिंपिक परिषदेच्या नियमानुसार न्यायालयात गुन्हा सिद्ध झालेल्या कोणाही व्यक्तीस आपल्या पदावर राहता येत नाही. त्यांना कोणत्याही संघटनेच्या निवडणुकीत सहभागी होता येत नाही. संबंधित व्यक्तीने तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा त्यांना दूर करण्यात यावे. याच नियमानुसार गेहलोत यांना दूर व्हावे लागेल, असे सांगितले जात आहे. 

गेहलोत दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण त्यांच्या या मोहिमेस अद्याप यश आलेले नाही, असेही सांगितले जात आहे.

Web Title: delhi hc removes kabaddi federation gehlot