धोनीने टाकला गुगली

सुनंदन लेले
बुधवार, 4 जानेवारी 2017

महेंद्रसिंग धोनीने एक वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत सगळ्यांना धक्का दिला होता. बरोबर एका वर्षाने धोनीने मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचे नेतृत्व आपणहून सोडून सगळ्यांना धक्का दिला आहे. धोनीचे विचार ऐकले असल्याने त्याने हा विचार का घेतला असावा याचा अंदाज येतो.

धोनीचे म्हणणे असायचे की, ‘चँम्पीयन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघात जे खेळाडू असतील त्यापैकी ९०% खेळाडू चांगली कामगिरी करून मुख्य वर्ल्डकप संघात असायला हवेत. वर्ल्डकप संघात असलेल्या खेळाडूंच्या मागे मर्यादित षटकांचे सामने खेळण्याचा तगडा अनुभव हवा. यश अपयशाच्या झोपाळ्यावर बसून त्यांच्या विचारात खेळात प्रगल्भता यायला हवी. अशा संतुलन साधल्या गेलेल्या आणि स्थिरावलेल्या संघाचे नेतृत्व करून; भारतीय संघाकडून चांगला खेळ करून दाखवायची शक्यता कर्णधाराकरता वाढते''. नेमका हाच विचार धोनीच्या मनात घोळत असावा. जर आपण २०१९ वर्ल्डकपमधे १००% खेळूच अशी खात्री नाही; तर त्याला हे वाटणे स्वाभाविक आहे. विराट कोहलीला चँम्पीयन्स ट्रॉफीचा संघ त्याच्या पसंतीनुसार निवडायची संधी मिळावी आणि तोच संघ मुख्य वर्ल्डकपपर्यंत एकत्र राहावा,’ अशी त्याची धारणा होणे स्वाभाविक आहे. 

याच विचारांनी धोनीने नेतृत्व सोडले असावे. त्याच बरोबर आपला संघात समावेश एक चांगला उपयुक्त खेळाडू म्हणूनच केला गेलेला असावा, असा त्याचा आग्रह असावा. आत्ताच्या क्षणाला धोनी मर्यादित षटकांच्या भारतीय संघात १००% बसतो. त्याच्या खेळातील तडफ किंचितही कमी झालेली दिसत नाही. विराट कोहली जरी कर्णधार झाला तरी त्याला धोनी खेळाडू म्हणून संघात असणे गरजेचे वाटणारच. उलट कर्णधार पदाची जबाबदारी डोक्यावरून गेल्यावर त्याच्यातील फलंदाज अजून आक्रमकतेने मनमोकळी फलंदाजी करू शकतो.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळात पदाधिकारी खुर्ची पकडून ठेवायचा जिवाच्या आकांताने प्रयत्न करत असताना भारतीय संघाचा कर्णधार सुजाणपणा दाखवत आपणहून नेतृत्व सोडतो, जेणे करून पुढच्या नेत्याला आपला संघ घडवायची योग्य मुभा मिळावी. याला म्हणतात स्वखुशीने बॅटन पास करणे. शिका शिका राजकारण्यांनो आणि बीसीसीआय पदाधिकार्‍यांनो शिका धोनीकडून... 

Web Title: Dhoni put googly