धोनी आत्तापर्यंतचा सर्वोत्तम कर्णधारः कोहली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

धोनी आणि मी पूर्ण व्यावसायिक खेळाडू आहोत. एकमेकांना आम्ही समजून आहोत. पूर्वी धोनी कर्णधार असताना मी मते मांडत होतो आणि धोनी निर्णय घेत होता. आता तो मते मांडेल आणि मी निर्णय घेईन, इतकाच काय तो बदल झाला आहे.
- विराट कोहली, भारतीय कर्णधार

पुणेः भारतीय क्रिकेटचा विचार जेव्हा केला जाईल तेव्हा धोनी हाच सर्वोत्तम कर्णधार असल्याचे म्हटले जाईल, यात शंकाच नाही, असे सांगून भारताचा नवा कर्णधार विराट कोहली याने मैदानावर त्याच्याकडून सल्ला घेण्यास आपल्याला कधीच कमीपणा वाटणार नाही, असे आज (शनिवार) स्पष्ट केले.

भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेस उद्यापासून येथे सुरवात होत आहे. सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना कोहली म्हणाला, "धोनी अत्यंत हुशार आणि कल्पक कर्णधार आहे. मैदानावरील अडचणीच्या वेळी त्याच्याकडून सल्ला घेण्यास मला गैर काहीच वाटणार नाही. विशेषतः डीआरएसबाबत म्हणाल, तर कारकिर्दीत जेव्हा जेव्हा धोनीने डीआरएसचा उपयोग केला, तेव्हा तेव्हा त्याला 95 टक्के यश लाभले आहे.'' धोनी पुन्हा एकदा अधिक स्वातंत्र्य घेऊन मोकळेपणाने फलंदाजी करू शकेल, असेही कोहलीने स्पष्ट केले.

'चॅंपियन्स करंडक स्पर्धेचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही मालिका खेळणार आहोत. कारण, यानंतर चॅंपियन्स करंडकापर्यंत आम्ही फारसे एकदिवसीय क्रिकेट खेळणार नाही. त्यामुळे हीच काय ती मालिका आमच्यासाठी सरावाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची असेल, असेही कोहली म्हणाला.

युवराजसिंगच्या निवडीचे समर्थन करताना तो म्हणाला, "हार्दिक पांड्या, केदार जाधव असे मधल्या फळीचे पर्याय आमच्याकडे खूप आहेत. पण, आम्हाला मधल्या फळीत अनुभवी फलंदाज हवा होता. युवराजची स्थानिक स्पर्धेतील कामगिरीदेखील चांगली होती. त्याचबरोबर धोनी आणि युवराज ही मधली जोडी चांगली जमते. या जोडीकडून पांड्या आणि केदार यांना शिकण्यासारखे खूप काही आहे.''

Web Title: Dhoni will be giving his views, I will take decisions: Kohli