डायना एडल्जींनी नाकारला ‘जीवनगौरव’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीतील डायना एडल्जी यांची भारतीय क्रिकेटच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती; परंतु ज्या दुहेरी हितसंबंधांच्या कारणावरून त्यांनी हा पुरस्कार सन्मानपूर्वक नाकारला.

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार पाहण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीतील डायना एडल्जी यांची भारतीय क्रिकेटच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती; परंतु ज्या दुहेरी हितसंबंधांच्या कारणावरून त्यांनी हा पुरस्कार सन्मानपूर्वक नाकारला.

बीसीसीआयच्या तीन सदस्यीय समितीने एडल्जी यांच्यासह दिवंगत पंकज रॉय यांचीही जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. एडल्जी १७ वर्षांच्या कारकिर्दीत २० कसोटी आणि ३४ एकदिवसीय सामने खेळल्या आहेत, त्यांनी अनुक्रमे ६३ आणि ४६ विकेट, अशी कामगिरी केली आहे. डायना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळल्या त्या वेळी महिला क्रिकेट संघटना बीसीसीआयशी संलग्न नव्हती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी त्यांनाच पैशांची जमवाजमव करावी लागत होती.

पुरस्कार शिफारस समितीत वरिष्ठ पत्रकार एन. राम, बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सी.के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांचा समावेश आहे. एडल्जी पदावर असताना त्यांची शिफारस करणे योग्य आहे का किंवा ही शिफारस हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित करीत नाही का? असा प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांना विचारला असता, त्यांनी या शिफारशी मी पाहिलेल्या नाहीत आणि माझ्यापर्यंत आलेल्याही नाहीत, असे उत्तर दिले. 

सुधा शहा यांना पुरस्कार
महिला क्रिकेटमध्ये जीवनगौरव पुरस्कार माजी कसोटीपटू सुधा शहा यांना जाहीर झाला.

अंशुमन यांना जीवनगौरव
दरम्यान, कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कारासाठी अंशुमन गायकवाड यांची निवड झाली. याशिवाय पंकज रॉय यांना हा पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला. खास पुरस्कारासाठी अब्बास अली बेग यांची निवड झाली. याशिवाय नरेन ताम्हाणे व बुधी कुंदरन यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला.

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीची मी सदस्या असल्यामुळे या क्षणाला मी हा पुरस्कार स्वीकारणे योग्य नाही. पुरस्कार जाहीर होताच मी कुटूंबिय, मित्र आणि जवळच्या व्यक्तींशी चर्चा केली आणि जोपर्यंत प्रशासकीय समितीमध्ये आहे तो पर्यंत पुरस्कार न स्वीकारण्याचे एकमताने ठरले. खरे तर गतवर्षीही माझ्या नावाची शिफारस करण्यात येत होती, तेव्हाही मी स्पष्ट शब्दात नकार दिला होता. या पुरस्कारासाठी माझी शिफारस केल्याबद्दल पुरस्कार समितीची ऋणी आहे.
- डायना एडल्जी, बीसीसीआय प्रशाकीय समितीच्या सदस्या

Web Title: diana edulji jeevangaurav award reject