नसेल मुंबईचा खेळाडू संघात.. काय बिघडलं? 

रितेश कदम 
सोमवार, 26 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

नुकत्याच झालेल्या भारत-इंग्लंड कसोटी क्रिकेट मालिकेदरम्यान संघाच्या चाहत्यांसाठी एक अभूतपूर्व घटना घडली. मुंबईचा एकही खेळाडू भारतीय संघात नव्हता. गेल्या अनेक वर्षांतील हा बहुदा पहिलाच प्रसंग असावा.. चित्रपटामध्ये नायक नसेल, तर तो 'चित्रपट' होऊच शकत नाही; तसंच 'मुंबईचा खेळाडू संघात नसेल, तर भारतीय क्रिकेट पूर्ण होऊच शकत नाही, अशी श्रद्धा (किंवा अंधश्रद्धा) इथे रुजलेली आहे. 

इतिहास गवाह है! भारताने क्रिकेट खेळायला सुरवात केल्यापासून मुंबई क्रिकेटचे भारतीय संघात नेहमीच वर्चस्व राहिलेले आहे. किंबहुना, वर्षानुवर्षे मुंबई ही भारतीय क्रिकेटची अघोषित राजधानीच होती. स्वातंत्र्यापासून इथे क्रिकेट खोलवल रुजलेलं! जसं इथे सूतगिरण्यांसाठी पोषक वातावरण होतं, तसंच क्रिकेटचंही होतं. आमच्या लहानपणी गावामध्ये एखादा मुलगा चांगला क्रिकेट खेळू लागला, की प्रशिक्षक लगेच म्हणायचे.. 'पोरगा गुणी आहे.. मुंबईला पाठवा याला!' 

मुंबईच्या खेळाडूंना मुंबई क्रिकेटचा पहिल्यापासूनच जाज्ज्वल्य अभिमान! एक जमाना होता.. रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत 'बाकीचे तीन संघ कोणते असतील' यावरच चर्चा असायची. सहजासहजी हार न मानणारे, 'फायटर' अशी मुंबईकरांची इमेज आहे. कदाचित यांचे 'डीएनए'चे स्ट्रक्‍चरही क्रिकेटच्या बॅटसारखेच असावे! 1980 च्या दशकात भारतीय संघापेक्षा मुंबईचा संघ काकणभर सरसच असायचा. 

पण आता परिस्थिती बदलली आहे. 'बीसीसीआय'ने अनेक छोट्या-छोट्या शहरांत, गावांमधून गुणवान खेळाडू शोधण्याची जबाबदारी माजी क्रिकेटपटूंना दिली. त्यातून अनेक गुणवान खेळाडू समोर आले. त्याआधी पुरेशा सुविधा, मार्गदर्शन आणि योग्य सल्ल्याअभावी ग्रामीण भागातील खेळाडू मागे पडायचे. महंमद कैफ, उमेश यादव, महंमद शमी, रवींद्र जडेजा वगैरे असेच छोट्या निमशहरी भागातून आलेले खेळाडू! पंजाब-सिंध-गुजरात-मराठा या उक्तीप्रमाणे आता भारतीय संघातही विविध भागांतील खेळाडूंना संधी मिळत आहे. सध्या बऱ्याच अंश भारतीय संघ स्थिरावला आहे. पण लगेच ओरडही होतेय, की मुंबईच्या गुणी खेळाडूंवर अन्याय होतोय, मुंबईकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होतंय वगैरे वगैरे..! त्यात काही प्रमाणात तथ्य असेलही! पण त्यामुळे फार मोठा गजहब करण्याचे कारण नाही. नसेलही सध्या मुंबईचा एकही खेळाडू भारतीय संघात.. काय बिघडलं? 

अंतिम संघात अकरा खेळाडूच निवडले जाऊ शकतात. मुंबईशिवायही बाकीच्या ठिकाणी क्रिकेट खेळलं जात आहे आणि ते खेळाडूही चांगली कामगिरी करत भारतीय संघात जागा मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. ही क्रिकेटसाठी चांगलीच गोष्ट आहे. 'फक्त मुंबईचे खेळाडू गुणी आणि इतरांपेक्षा सरस' हा अट्टाहास सोडला पाहिजे. कदाचित, काही वर्षांनी मुंबईचे तीन-चार खेळाडूही एकाच वेळी भारतीय संघात असू शकतील. ही एक फेज आहे.. 

भारतीय क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे 'कोटा सिस्टिम' आहे, हे सर्वांना माहीत असलेले गुपित आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी खेळाडू मुंबईची कास धरायचे; तर मुंबईचा कोटा पूर्ण झाल्यामुळे रोहन गावसकर बंगालकडून खेळत होता. 

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत त्रिशतक झळकावून करुण नायरने काही सामन्यांसाठी भारतीय संघातील स्थान भक्कम केले. मग कुणाला तरी काढावे लागणारच! आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिरावणे खूपच अवघड आणि अस्थिर असते. 

'हा खेळाडू गुणवान आहे.. याला भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे' हा विचार योग्य आहे; पण 'हा खेळाडू मुंबईचा आहे म्हणून याला भारतीय संघात स्थान मिळाले पाहिजे' ही मानसिकता बदलली पाहिजे. खेळापेक्षा खेळाडू आणि भारतीय संघापेक्षा राज्य मोठे होता कामा नये! 

'चक दे! इंडिया'मध्ये शाहरुख खान सर्व खेळाडूंना त्यांची ओळख विचारतो आणि शेवटी एक वाक्‍य उच्चारतो.. 'मुझे किसी स्टेट नाम ना सुनाई देता है, ना दिखाई देता है! सुनाई देता है, तो सिर्फ एकही नाम! इंडिया!' त्याचप्रमाणे आपणही एकच नाव मुखी ठेवायचे.. 'इंडिया'!

Web Title: Do we always need Mumbai player in Indian cricket team, asks Ritesh Kadam