अंकुरला डबल ट्रॅपमध्ये सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

मुंबई - अंकुर मित्तलने दिल्ली विश्‍वकरंडक स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढत मेक्‍सिको विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. ही कामगिरी करताना त्याने जागतिक विक्रमाचीही बरोबरी साधली. मात्र, त्याने आपण वचपा काढलेला नाही. खेळात चढउतार असतातच, असे सांगत सर्वच चाहत्यांची मनेही जिंकली.

नवी दिल्ली स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या जेम्स विलेट याने अंकुरला मागे टाकत बाजी मारली. अंकुरने एका महिन्याच्या आतच विलेटला मागे टाकत कारकिर्दीतील पहिले विश्‍वकरंडक सुवर्णपदक जिंकले. नेमबाजीतील बदलानुसार डबल ट्रॅप स्पर्धा ऑलिंपिकमध्ये नसेल. त्याऐवजी ट्रॅपची मिश्र दुहेरी स्पर्धा होणार आहे, या निर्णयास जागतिक संघटनेने मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची मंजुरीच शिल्लक आहे. 

ॲकापुल्का येथील क्‍लब डे कॅझा शूटिंग रेंजवर विलेट आणि अंकुरची सुरवातीच्या काही शॉट्‌सनंतर बरोबरी होती. 

सहाव्या फैरीत विलेटकडून तीन चुका झाल्या, तेव्हापासून अंकुरने घेतलेली आघाडी शेवटपर्यंत राखली आणि जेम्सला यशापासून दूर ठेवले. चीनच्या यिंग याने ब्राँझ पदक जिंकले.  

शेवटच्या दहा शॉट्‌समध्ये अंकुरने एकही चूक केली नाही. त्याने अखेर अंतिम फेरीत ७५ गुणांचा अचूक वेध घेतला आणि सुवर्णपदक विक्रमाच्या बरोबरीसह निश्‍चित केले. तो १३८ गुणांसह प्राथमिक फेरीत दुसरा आला होता, पण अंतिम फेरीत त्याने कामगिरी उंचावली.

मी वचपा काढला, हे मी कधीही म्हणणार नाही. जेम्स महान शूटर आहे. खेळात चढउतार होतच असतात. त्यात हार-जीत चालतेच. सकाळी प्राथमिक फेरी होत असताना वाऱ्याचा वेग जास्त होता, अंतिम फेरीच्या वेळीही वारे वाहत होते, पण त्याचा वेग जास्त नव्हता.
- अंकुर मित्तल

Web Title: Double trap gold medal