World Cup 2019 : आजच्या सामन्यावर तीन संघांचे भवितव्य अवलंबून

cricket
cricket

चेस्टर ली स्ट्रिट : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अजून बाद फेरीचे चित्र स्पष्ट होत नाही. हे चित्र अधिक स्पष्ट होण्यासाठी आज (बुधवार) इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान होणारा सामना खूप महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे या सामन्याचे महत्त्व खेळणाऱ्या संघांपेक्षा उपांत्य फेरीची आस लावून बसलेल्या पाकिस्तान संघाचे अधिक लक्ष राहणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यावर इंग्लंड, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या तीन संघांचे भवितव्य अवलंबून आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य  फेरीसाठी पात्र  झालेले आहेत.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी आज इंग्लंडला विजय आवश्‍यक आहे. या सामन्यातील इंग्लंडचा विजय मात्र पाकिस्तानला परवडणारा नसेल. इंग्लंडने हा सामना जिंकल्यास पाकिस्तान संघासाठी विश्‍वकरंडक स्पर्धेचे दरवाजे बंद होतील. न्यूझीलंडने मात्र हा सामना जिंकल्यास इंग्लंडचे दरवाजे बंद होतील आणि पाकिस्तानसाठी उघडतील. हे सध्याचे विश्‍वकरंडक स्पर्धेतील समीकरण आहे. समीकरण काही सांगत असले, तरी इंग्लंड आणि न्यूझीलंडचे विश्‍वकरंडकातील आव्हान हे त्यांच्याच हातात आहे हे नक्की. 

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका संघाकडून झालेल्या पराभवानंतर इंग्लंडने बर्मिंगहॅमला भारताचा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान जिवंत ठेवले. गेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत साखळीतच इंग्लंडचे आव्हान संपुष्टात आले होते. ती नामुष्की या वेळी टाळण्यासाठी इंग्लंड नक्की प्रयत्न करणार. जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टॉ या सलामीच्या जोडीने इंग्लंडला चांगलाच हात दिला आहे. त्यांच्याच हाताला पकडून इंग्लंडचा पुढे जाण्याचा विचार राहिल्यास आश्‍चर्य वाटायला नको. त्यानंतर ज्यो रुट, इयॉन मॉर्गन, बेन स्टोक्‍स, जोस बटलर अशी तगडी फलंदाजी इंग्लंडकडे असल्यामुळे त्यांना आव्हान उभारणे किंवा त्याचा पाठलाग करणे फारसे जड जाणार नाही. 

गोलंदाजीत ख्रिस वोक्‍सची अचूकता, मार्क वूडचा भन्नाट वेग याला लियाम प्लंकेट याची साथ मिळाल्यास इंग्लंडला न्यूझीलंडवर वर्चस्व राखणे कठिण जाणार नाही. फिरकीची बाजू सांभाळण्यास आदिल रशिद समर्थ असला, तरी खेळपट्टीच्या स्वरुपानुसार मोईन अली याला खेळविण्याचा विचार झाल्यास पुन्हा एकदा लियाम प्लंकेटला वगळावे लागेल. तेव्हा बेन स्टोक्‍सला पाचव्या गोलंदाजाची जबाबदारी पार पाडावी लागेल. 

दुसरीकडे न्यूझीलंड संघाला विश्‍वकरंडक स्पर्धेत पुन्हा विजयाच्या मार्गावर परतायला निश्‍चित आवडेल. स्पर्धेत अपराजित राहून आगेकूच करणाऱ्या न्यूझीलंड संघाला मात्र या प्रवासात दोन पराभव पत्करावे लागल्याने त्यांचा आत्मविश्‍वास ढासळला असेल. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन या वेगवान गोलंदाजांची कामगिरी त्यांच्या विजयात मोलाची ठरली आहे. त्यांच्या फलंदाजीत सातत्य नाही. सलामीच्या जोडीचे अपयश त्यांना चांगलेच सलत असेल. केन विल्यम्सन, रॉस टेलर हीच मधली फळी त्यांच्या मदतीला धावून आली आहे. मधल्या फळीत या दोघांखेरीज अन्य फलंदाजांना येत असलेले अपयश ही न्यूझीलंडची दुसरी डोकेदुखी आहे. यात सुवर्णमध्य काढून न्यूझीलंडला उद्या इंग्लंडसमोर उभे रहावे लागेल. 

आमची फलंदाजी चांगली होत नाही हे खरे असले, तरी आम्ही स्पर्धेत कुठे आहोत आणि कुठे जायचे आहे हे चांगले माहीत आहे. 
- क्रेग मॅकमिलन, न्यूझीलंडचे फलंदाजी प्रशिक्षक 

अलीकडच्या काळात आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आहोत. एखाद दुसऱ्या पराभवाने खचून वगैरे गेलेलो नाही. आमचा संघ जिगरबाज आहे आणि धाडस, आक्रमकता आमची ओळख आहे. आम्ही असेच खेळू. 
- इयॉन मॉर्गन, इंग्लंडचा कर्णधार 

आमने सामने 
इंग्लंड न्यूझीलंड 
89 सामने 89 
40 विजय 43 
43 पराबव 40 
2 बरोबरी 2 
4 नो-रिझल्ट 4 

विश्‍वकरंडकात... 
8 सामने 8 
3 विजय 5 
5 पराभव 3 
6-322 सर्वोच्च 6-239 
123 निच्चांकी 2-125 

विशेष नोंदी... 
-इंग्लंडकडून वैयक्तिक सर्वोच्च खेळी किथ फ्लेचर 131, न्यूझीलंडकडून नॅथन ऍस्टल 101 
-इंग्लंडकडून 2 शतके, 7 अर्धशतके, तर न्यूझीलंडकडून 1 शतक आणि 10 अर्धशतके 
-इंग्लंडच्या 50 खेळाडूंमध्ये 1272 धावा, 61 बळी, न्यूजीलंडच्या 50 खेळाडूंत 1508 धावा आणि 52 बळी 
-इंग्लंडकडून सर्वोत्तम गोलंदाजी बॉब विलीस 4-42, न्यूझीलंडकडून टिम साऊदी 7-33 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com