Eng vs ire : आयर्लंडसमोर इंग्लंडचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eng vs ire

Eng vs ire : आयर्लंडसमोर इंग्लंडचे आव्हान

मेलबर्न : ट्वेंटी-२० विश्‍वकरंडकात उद्या दोन लढतींचा थरार रंगणार आहे. एकीकडे पहिल्या लढतीत झिम्बाब्वेकडून पराभूत झालेल्या आयर्लंडसमोर सलग दुसऱ्या विजयाची आस असलेल्या इंग्लंडचे आव्हान असणार आहे; तर दुसरीकडे गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला सलामीलाच पराभवाचा धक्का देणारा न्यूझीलंडचा संघ अफगाणिस्तानशी दोन हात करणार आहे. या दोन्ही लढती मेलबर्न येथेच होणार आहेत.

इंग्लंडने सलामीच्या लढतीत अफगाणिस्तानला हरवत शानदार सुरुवात केली. या लढतीत कर्णधार जोस बटलर, ॲलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स व हॅरी ब्रुक या फलंदाजांना अपयशाला सामोरे जावे लागले.

सॅम करणची प्रभावी गोलंदाजी (५/१०) व लियाम लिव्हिंगस्टोन याची धडाकेबाज फलंदाजी (२१ चेंडूंत नाबाद २९ धावा) याच जोरावर इंग्लंडने या लढतीत यश मिळवले; मात्र प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये पुढे वाटचाल करावयाची असल्यास वरच्या क्रमांकावरील फलंदाजांना कात टाकावी लागणार आहे. सॅम करण, ख्रिस वोक्स, मार्क वूड, बेन स्टोक्स या वेगवान गोलंदाजांनी पहिल्या लढतीत चमक दाखवली असून अदिल रशीद या फिरकी गोलंदाजाला आपली धमक दाखवावी लागणार आहे.

आकडेवारीवर नजर

२०२१ नंतर झालेल्या टी-२० सामन्यांमधील आकड्यांचा विचार केल्यास क्रिकेटच्या या प्रकारात प्रत्येक १७ चेंडूंनंतर इंग्लंडचा संघ षटकार लगावत आहे.

टी-२० वर्ल्डकपमध्ये प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. सातपैकी सहा लढतींमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे.

आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगला वर्ल्डकपमधील लढतींमध्ये १७ डावांमध्ये २४.६४ च्या सरासरीने धावा करता आलेल्या आहेत.