तो क्षण सोनेरी होता : सुनील गावसकर 

सुनंदन लेले
सोमवार, 22 जानेवारी 2018

"आम्हा काही मोजक्या लोकांना नेल्सन मंडेला ह्यांना भेटायची परवानगी मिळाली होती . माझी पत्नी सुद्धा माझ्या सोबत होती. काय व्यक्तिमत्व आहे नेल्सन मंडेला ह्यांचे. फारच प्रेमळ माणूस ...शांत नम्र ... खरंच कमाल . आम्ही खरंच भारावून गेलो होतो त्यांना भेटून . त्यांना भारताबद्दल खूप प्रेम आहे . मंडेला गांधीजीना खूप मानत होते ना", गावसकर आठवणीत रमत सांगत होते. 

भारतीय संघाने सलग दुसऱ्या दिवशी वोडरर्स क्रिकेट मैदानावर जोरकस सराव केला . पहिल्या दोन कसोटी सामन्यातील चुका सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न खेळाडू प्रशिक्षकांच्या मदतीने करत होते. पण खरी कहाणी मला महान माजी फलंदाज सुनील गावसकर कडून ऐकायला मिळाली. गावसकर कहाणी सांगतात तेव्हा प्रसंग डोळ्यासमोर कसा उभा राहतो याची ही कहाणी म्हणजे सुंदर उदाहरण आहे. 

सुनील गावसकर यांच्याशी भेट झाल्यावर मी सहज प्रश्न विचारला कि तुमची नेल्सन मंडेला बरोबर भेट झाली असेल ना ? 

"म्हणजे काय माझ्यासाठी तो क्षण सोनेरी होता", गावसकर सांगू लागले. 

"आम्हा काही मोजक्या लोकांना नेल्सन मंडेला ह्यांना भेटायची परवानगी मिळाली होती . माझी पत्नी सुद्धा माझ्या सोबत होती. काय व्यक्तिमत्व आहे नेल्सन मंडेला ह्यांचे. फारच प्रेमळ माणूस ...शांत नम्र ... खरंच कमाल . आम्ही खरंच भारावून गेलो होतो त्यांना भेटून . त्यांना भारताबद्दल खूप प्रेम आहे . मंडेला गांधीजीना खूप मानत होते ना", गावसकर आठवणीत रमत सांगत होते. 

"भेटीच्या अंती मी त्यांना भेटून सांगितले कि सर मला काहीतरी स्मृतिचिन्ह हवे आहे तुमच्याकडून या भेटीचे. ते हसले आणि आत गेले . येताना चक्क बॉक्सिंग ग्लोव्हज घालून आले आणि म्हणाले, 'हे ग्लोव्हज मला महान बॉक्सर मोहम्मद अलीने दिले आहेत...पण हे मी तुला देणार नाही कारण त्याच्याबद्दल माझ्या काही मोलाच्या स्मृती आहेत... तुरुंगात असताना तंदुरुस्त राहण्यासाठी मी बॉक्सिंग ग्लोव्हज घालून शॅडो प्रॅक्टिस करायचो ... म्हणून हे ग्लोव्हज मी नाही देणार ' डोळे मिचकावत मंडेला म्हणाले आणि परत आत गेले ते मिनिटभर बाहेर आलेच नाहीत. माझ्या काळजात धस्स झाले . मग ते बाहेर आले तेंव्हा त्यांच्या हातात पुस्तक होते 'थेअरी ऑफ मॉरल लाइफ'. आणि ते पुस्तक त्यांनी मला हाती दिले आणि हसले . जेव्हा मी ते पुस्तक उघडून बघितले तेंव्हा नेल्सन मंडेलांनी खास माझ्यासाठी संदेश लिहून सही करून दिली होती. मी धान्य झालो. म्हणून म्हणालो ना तो क्षण सोनेरी होता. बाकीचे सगळे म्हणत होते कि मला मस्त स्मृतिचिन्ह मिळाले तेव्हा मी त्यांना म्हणालो कि विचारल्याशिवाय काही मिळत नाही. धीटपणा करून विनंती करता यायला पाहिजे", सुनील गावसकर आठवणीत रमताना भारावून जाऊन सांगून गेले.

सुनील गावसकरांनी दिलेल्या सल्ल्याचा लगेच सुयोग्य वापर करत मी त्यांना विनंती केल्यावर त्यांनी मंडेलांनी सही करून संदेश लिहिलेल्या त्या पानाचा फोटो मला दिला तो सोबत देतो आहे. 

Web Title: esakal marathi news sundandan lele writes about sunil gawaskar