खेळ शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक बनवा : सचिन तेंडुलकर  सुनंदन लेले 

खेळ शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक बनवा : सचिन तेंडुलकर  सुनंदन लेले 

राष्ट्रपतींनी नियुक्त केलेला राज्यसभा सदस्य म्हणून भारतरत्न सचिन तेंडुलकरने 21 डिसेंबरला आपल्या खासदारकीच्या कालखंडात पहिल्यांदा राज्यसभेत भाषण करायचा प्रयत्न काही सदस्यांनी गोंधळ घातल्याने मागे पडला. त्यामुळे आज (शुक्रवार) सचिनने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून 15-17 मिनिटांच्या भाषणात सचिनने भारतात खेळण्याची संस्कृती जागवण्याचे आव्हान करताना "खेळ शालेय अभ्यासक्रमाचा अविभाज्य घटक बनवा', अशी आग्रही मागणी केली. भारतातील माजी खेळाडूंनी केलेल्या कामगिरीचा विसर पडू नये म्हणून "अनफरगेटेबल स्पोर्टींग हिरोज अँड लिजंडस्‌ ऑफ इंडिया' अशी एक पुस्तिका सादर केली. त्यात विविध खेळातील महान खेळाडूंच्या कमाल कहाण्या अगदी आठवी, नववीतील विद्यार्थ्यांना समजेल या भाषेत सादर केल्या. 

"माझे स्वप्न तंदुरुस्त भारताचे आहे', असे भाषणाला सुरुवात करतानाच सांगून सचिनने भारत हा मधुमेहाचे केंद्रस्थान झाला आहे आणि पुढील काही वर्षात भारतीय लोक विविध आजारांवर उपचार करण्यात चार कोटी रुपये खर्च करणार असल्याच्या अहवालाचा दाखला देत सगळ्यांना जागे केले. मोबाईलच्या जमान्यात आपण सगळे खूप मर्यादित हालचाली करू लागलो आहोत हे सांगून भारत हा खेळावर प्रेम करणारा देश असला तरी त्याला प्रेक्षक म्हणून नाही तर खेळाडू म्हणून खेळावर प्रेम करणारा देश व्हायला पाहिजे हे सांगितले. 

कधी वडिलांनी दिलेला संदेश कधी माजी खेळाडूंची कहाणी तर कधी नेल्सन मंडेलांचे विचार सांगून सचिनने खेळाचे महत्त्व पटवून द्यायचा प्रयत्न केला. शालेय अभ्यासक्रमात खेळ एक अविभाज्य घटक म्हणून विणला जायला हवा ही सचिनची आग्रही मागणी होती. खेळाडू म्हणून शाळा , जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूला गुण किंवा ग्रेड देण्यात यावी असे सचिनने सुचवले. 

भाषणादरम्यान सचिनने महान भारतीय महिला खेळाडूंपासून ते 101 वयाचे असताना मॅरेथॉन पळणाऱ्या परमेश्‍वरन यांचा उल्लेख आदराने केला. खेळातून निवृत्त झालेल्या खेळाडूंच्या ज्ञानाचा वापर प्रशिक्षणाकरता केला गेला पाहिजे अशी सूचना सचिनने केली. काही महान माजी खेळाडूंची गंभीर आर्थिक परिस्थिती सांगताना सचिनचा आवाज काहीसा कापरा झाला. 

भाषणाच्या शेवटाला सचिनने 2009 साली भारतातील सर्व मुलांना किमान चांगले मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे हा कायदा जसा पास केला गेला तसाच "खेळण्याचा हक्क' हा कायदा त्यातच पुढे जाऊन केला पाहिजे असे आवाहन सदस्यांना केले. 

""पालक मुलांना जेवलास का आणि अभ्यास केलास का हे रोज नक्की विचारतात... माझ्याकरता तो दिवस मोठा असेल जेव्हा पालक या दोन मूलभूत प्रश्‍नांसोबत "आज खेळलास का', हा प्रश्‍न विचारतील'', असे सांगून सचिनने भाषण संपवले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com