विराटचे मोठे द्विशतक; श्रीलंकेची अडखळती सुरुवात 

sri lanka team
sri lanka team

दिल्ली कसोटी सामन्याच्या दुसरा दिवस विराट कोहलीच्या मोठ्या द्विशतकाने आणि श्रीलंकन संघाने प्रदूषणाचे कारण सांगत खेळ चालू ठेवण्यात केलेल्या चालढकलीने गाजला. विराट कोहलीची त्रिशतकाकडे चाललेली वाटचाल श्रीलंकन संघाने उपहारानंतर प्रदूषणाचे कारण पुढे करत खेळात व्यत्यय आणून रोखली. श्रीलंकन खेळाडूंच्या चालीने विराटची एकाग्रता भंग झाली. 243 धावांवर विराट बाद झाल्यावरही श्रीलंकन खेळाडू क्षेत्ररक्षण करताना चालढकल करताना बघून विराटने भारताचा डाव 7 बाद 536 धावांवर घोषित केला. फलंदाजीला आलेल्या कोणाही श्रीलंकन फलंदाजाला दिल्लीच्या प्रदूषणाचा त्रास झाला नाही हे नवल. भारतीय गोलंदाजांनी दम लावून केलेल्या माऱ्याने पहिल्या डावात दुसऱ्या दिवस अखेरीला श्रीलंकेचे 3 फलंदाज 131 धावांमध्ये बाद करण्यात यश आले. 

रविवारच्या सुट्टीचा फायदा घेऊन दिल्लीकर प्रेक्षक कोटला मैदानावर हजर झाले ते विराट कोहलीची फलंदाजी बघायला. विराटने प्रेक्षकांना खूश करताना बहारदार फलंदाजी करत सहजी द्विशतकी मजल पार केली. विराटचे हे 6वे द्विशतक होते. लागोपाठच्या दोन कसोटी डावात द्विशतक करणारा विराट विनोद कांबळीनंतरचा दुसराच भारतीय फलंदाज ठरला. तसेच सर्वाधिक द्विशतके करणारा कर्णधार हा ब्रायन लाराचा विक्रम विराटने मोडला. समोरून रोहित शर्माने नेहमीच्या थाटात मुक्त फटकेबाजी केली. उपहारापर्यंत फक्त रोहित शर्माला बाद करण्यात श्रीलंकन गोलंदाजांना यश आले. उपहाराला विरेंद्र सेहवाग , "विराट जरूर त्रिशतक बनायेगा'', असे म्हणून गेला. 

श्रीलंकेचा रडीचा डाव
उपहारानंतर खेळाची सुरुवात करतानाच सगळ्यांच्या भुवया उंचावल्या कारण 5-6 श्रीलंकन खेळाडू तोंडाला मास्क लावून मैदानात उतरले. रविवारी दिल्लीचे हवामान प्रदूषणाने भरलेले होते यात शंका नाही. फक्त त्याची आठवण श्रीलंकन खेळाडूंना उपहारानंतर कशी काय झाली हा प्रश्‍न होता. प्रत्येक षटकानंतर गमागे आणि लकमल श्‍वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार करू लागले. खेळाची गती एकदम मंदावली. ज्याचा परिणाम फलंदाजांच्या एकाग्रतेवर झाला. प्रथम अश्‍विन गमागेला बाद झाला आणि पाठोपाठ कोहली 243 धावांवर संदकनला पायचित झाला. श्रीलंकन खेळाडूंच्या वागण्याने नुसते प्रेक्षकच नाही तर भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री त्रस्त झाले. अखेर 7बाद 536 धावसंख्येवर विराट कोहलीने डाव घोषित केला. 

महंमद शमीने डावाच्या पहिल्याच चेंडूवर करुणारत्नेला झेलबाद करवले. समोरून ईशांत शर्माने धनंजयाला पायचित केले. श्रीलंकन फलंदाजीला अजून मोठे खिंडार दोन दादा वेगवान गोलंदाजांनी पाडले असते पण दिलरुवानचा सोपा झेल शिखरने आणि अँजेलो मॅथ्यूजचा सोपा झेल विराट कोहलीने सोडला. मिळालेल्या जीवदानांचा फायदा घेत दिलरुवानने 9 चौकार मारले. 42 धावांवर अखेर त्याला रवींद्र जडेजाने पायचित केले. 

पहिल्या दोन कसोटी सामन्यात सपशेल अपयशी ठरलेल्या मॅथ्यूजने सुटलेल्या झेलाचा फायदा घेत फटकेबाजी केली. अश्‍विनला दोन षटकार मारून मॅथ्यूजने आक्रमक अर्धशतक फलकावर लावले. मॅथ्यूज - चंडीमल या दोन अनुभवी फलंदाजांनी किल्ला लढवत श्रीलंकेचा डाव 3 बाद 131 वर नेला. कोटलाची खेळपट्टी फलंदाजीला अजून उत्तम असल्याने भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेचा पहिला डाव संपवायला मेहनत करावी लागणार आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com