ऑस्ट्रेलियात सर्वच फलंदाजांकडून योगदान हवे : विराट

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018

गोलंदाज जबरदस्त कामगिरी करीत आहेत. आता प्रत्येक फलंदाजाने जर जबाबदारीने खेळ केला, तर ऑस्ट्रेलियातील यश दूर नसेल, असा विश्‍वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. वैयक्तिक खेळापेक्षा संघाचे हित लक्षात ठेवून कामगिरी करणे आवश्‍यक असल्याचेही त्याने सांगितले.

मुंबई : गोलंदाज जबरदस्त कामगिरी करीत आहेत. आता प्रत्येक फलंदाजाने जर जबाबदारीने खेळ केला, तर ऑस्ट्रेलियातील यश दूर नसेल, असा विश्‍वास कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केला. वैयक्तिक खेळापेक्षा संघाचे हित लक्षात ठेवून कामगिरी करणे आवश्‍यक असल्याचेही त्याने सांगितले.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मिशन ऑस्ट्रेलियासाठी उद्या शुक्रवारी रवाना होईल. त्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत विराट आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सकारात्मक दृष्टिकोन देहबोलीतूनही दाखवला. फलंदाजांनी साथ दिली, तर यश दूर नसेल, असे त्यांनी स्पष्ट केले. कसोटीत अव्वल असलेल्या टीम इंडियाला यंदा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडमध्ये हार पत्करावी लागली आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील यशावर सर्व पत अवलंबून आहे. या पार्श्‍वभूमीवर विराट आणि कंपनीची जबाबदारी वाढत आहे.

इंग्लंडमध्ये लॉर्डस कसोटी वगळता आम्ही तुल्यबळ खेळ केला. केवळ निर्णायक क्षणी कमी पडलो. या सर्व कमजोर बाबींचा अभ्यास केला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात हे क्षण कसे जिंकता येतील, याचा विचार केला आहे. गोलंदाज चांगल्या फॉर्मात आहेत. कसोटी जिंकण्यासाठी 20 विकेट मिळवण्याची त्यांची क्षमता आहे. त्यामुळे तळातील फलंदाजांसह प्रत्येकाने फलंदाजीत योगदान दिले, तर इतिहास दूर नसेल, असे विराट म्हणाला. संघाच्या गरजेनुसार मीसुद्धा बदल करतो, तसे बदल प्रत्येकाने करताना सातत्य राखायला हवे. रवी शास्त्री प्रशिक्षक झाल्यापासून मीसुद्धा वेळोवेळी काही बदल केले आहेत, असे विराटने सांगितले.

संयम महत्त्वाचा
गत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आम्ही तंदुरुस्तीमध्ये कमी होतो; पण आता त्यात सुधारणा आहे. ही तंदुरुस्ती संयमाशी निगडित आहे. कुकाबुरा चेंडूवर कधी बराच काळ यश मिळत नसते. त्यासाठी संयम ठेवून अचूक टप्प्यावर सातत्य आवश्‍यक असते. डेल स्टेन आणि आत्ता रबाडा हे दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज म्हणूनच यशस्वी ठरले. पण, पुन्हा एकदा सांगतो, की गोलंदाजीचा प्रश्न नसून फलंदाजांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे, याचा पुनरुच्चार भारतीय कर्णधाराने केला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चार कसोटी सामने संपल्यावर विश्‍वकरंडक स्पर्धेची मोहीम सुरू होणार आहे. आत्तापर्यंतच्या एकदिवसीय सामन्यांत प्रयोग केले; पण आता हे प्रयोग संपले. येथून पुढे थेट स्पर्धेची तयारी सुरू होईल.
- रवी शास्त्री, मुख्य प्रशिक्षक

Web Title: everyone should contribute in australia